संजय राऊत यांनी केली किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

0

मुंबई,दि.६: शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कालच संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने संजय राऊत यांची अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरचा फ्लॅटही जप्त केला आहे. १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरु केली होती. या मोहीमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम किरीट सोमय्या यांनी लाटली. हा पैसा त्यांनी २०१४ ची निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला. हा घोटाळा करून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी देशाच्या संरक्षणव्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतरणा केली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. ते बुधवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या मुद्द्यावरून किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. विक्रांत युद्धनौका भंगारात काढण्याचा निर्णय झाला तेव्हा किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. महाराष्ट्र सरकारला राष्ट्रीय भावना नाही, असे टीकास्त्र त्यांनी सोडले होते. राज्य सरकारला विक्रांत युद्धनौका वाचवता येत नसेल तर आम्ही त्यासाठी पैसा जमा करू, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले होते.

त्यानंतर किरीट सोमय्या यांच्या नेतृत्त्वाखाली ‘सेव्ह विक्रांत’ या उपक्रमातंर्गत पैसे जमवण्यास सुरुवात झाली. चर्चगेटपासून अंबरनाथपर्यंतच्या रेल्वे स्थानकांवर किरीट सोमय्या यांच्या लोकांनी डबे फिरवून पैसे गोळा केले. या माध्यमातून ५७ ते ५८ कोटी रुपयांचा निधी जमा झाला होता. ही रक्कम आपण राजभवनाकडे सुपूर्द करू, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले होते. मात्र, माहिती अधिकारातंर्गत राजभवन कार्यालयाला तशी विचारणा केली तेव्हा आमच्याकडे असे कोणतेही पैसे जमा झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हे पैसे कोणाच्या घशात आणि खिशात गेले?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. सोमय्या हे सीए असल्यामुळे असा पैसा कसा पचवायचे याची त्यांनी माहिती असल्याचेही राऊत यांनी म्हटले.

किरीट सोमय्या हे विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करत होते तेव्हा चर्चगेट स्थानकात काही लोकांनी पाच-पाच हजार रुपये देऊ केले होते. किरीट सोमय्या हे नेव्ही नगरमध्येही गेले होते. त्याठिकाणी विक्रांत युद्धनौकेवर काम केलेल्या कर्मचाऱ्यांनी तर या मोहीमेसाठी ५० हजार रुपयेही देऊ केले होते. गेल्या काही दिवसांमध्ये हे लोक मला भेटले आहेत. विक्रांत युद्धनौका अखेर भंगारात काढण्यात आली. त्यामुळे विक्रांत यु्द्धनौकेला वाचवण्यासाठी जमा केलेला हा ५७ ते ५८ कोटी रुपयांचा निधी कुठे गेला? हा तर अधिकृत आकडा आहे. प्रत्यक्षात या मोहीमेतंर्गत १०० कोटी रुपये जमा झाले असतील. हे पैसे किरीट सोमय्या यांनी २०१४ च्या निवडणुकीत वापरल्याचा संशय आहे. महाराष्ट्रातील पोलीस या सगळ्याची चौकशी करतीलच. मात्र, केंद्रीय तपास यंत्रणांनी नि:पक्षपातीपणे तपास करावा, असेही संजय राऊत यांनी म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here