मुंबई,दि.२: Aryan Khan: क्रूझ ड्रग पार्टीवर NCB ने धाड टाकली होती. या धाडीत त्यांनी अभिनेता शाहरूख खान (Shahrukh khan) याचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक केली होती. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणातून आर्यन खानला (Aryan Khan) सोडण्यासाठी २५ कोटींची मागणी करण्यात आल्याचे सांगत प्रभाकर सैलने खळबळ उडवून दिली होती. आर्यन खानच्या अटक प्रकरणात खंडणीचा आरोप करणाऱ्या प्रभाकर सैल यांची नार्कोटीस कंट्रोल ब्युरो (एनसीबी) दक्षता पथकाने दिवशी चौकशी केली. त्यामध्ये सैल याने किरण गोसावी व पूजा दादलानी यांच्या भेटीची जागा पथकाला दाखवली होती.
क्रूझ ड्रग पार्टी कारवाईमुळे तत्कालीन एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रश्न उपस्थित केले होते. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बऱ्याच गदारोळानंतर एनसीबीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी (SIT) नेमली होती. तसेच समीर वानखेडे यांची एनसीबीच्या विभागीय संचालकपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आर्यन खान याच्याकडे त्यावेळी ड्रग्ज सापडलेच नव्हते, असा अहवाल दिला आहे. त्यामुळे अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या भूमिकेवर नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज सापडलेच नाहीत तर मग त्याचा फोन ताब्यात घेऊन चॅटस का तपासण्यात आले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच कॉर्डिलिया क्रुझवर धाड घातली तेव्हा एनसीबीच्या नियमांप्रमाणे त्याचे व्हीडिओ चित्रीकरण करण्यात आले नव्हते, असेही एसआयटीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्यात अटक केलेल्या अनेक आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले आहेत, असेही एसआयटीने म्हटले आहे.