ठाणे,दि.४: एमआयएम (AIMIM) पक्षाच्या ठाण्यातील नेत्या सहर शेख यांनी पुन्हा एकदा आपल्या एका वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ उडवून दिली आहे. मुघल सम्राट औरंगजेबाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये औरंगजेबाचे समर्थन आणि उदात्तीकरण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पोस्टमध्ये नेमकं काय?
सहर शेख यांनी शेअर केलेल्या या डिजिटल पोस्टमध्ये औरंगजेबाच्या प्रतिमेसोबत विविध संदेश लिहिल्याचे दिसून आले. “इतिहास कधीही बदलता किंवा पुसला जाऊ शकत नाही,” असा दावा करत औरंगजेबाच्या राजवटीचे आणि सत्तेचे अप्रत्यक्ष समर्थन करण्यात आले आहे. तसेच, ऐतिहासिक संदर्भांचा आधार घेत औरंगजेबाची बाजू मांडण्याचा प्रयत्न या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या मालिकेत शेवटचा फोटो खुद्द सहार शेख यांचा असून, त्यावर मुघल संस्कृतीशी जोडलेले काही संदर्भ आणि ओळी लिहिल्याचे पाहायला मिळाले.
पूर्वीचे वाद आणि राजकीय वातावरण:
सहर शेख यांचे नाव याआधीही अनेकदा विविध मुद्द्यांवरून आणि आक्रमक वक्तव्यांमुळे वादात आले आहे. निवडणुकांमधील त्यांच्या काही विधानांनी यापूर्वीही मोठा गदारोळ माजवला होता. आता थेट औरंगजेबाच्या वाढदिवसाचे स्टेटस ठेवल्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत असून, यामुळे ठाणे आणि परिसरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








