सोलापूर,दि.१: तुम्हीही ऑफिस, फॅमिली किंवा मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुप्समधील (WhatsApp Group) सततच्या मेसेजने त्रस्त आहात का? किंवा ग्रुपमध्ये अचानक जोडल्या गेलेल्या नव्या सदस्याला जुनी माहिती समजावून सांगताना तुमची दमछाक होते का? तुमची हीच डोकेदुखी दूर करण्यासाठी लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप ‘व्हॉट्सॲप’ (WhatsApp) ने युजर्ससाठी ४ नवीन आणि जबरदस्त फीचर्स लाँच केले आहेत.
या नवीन अपडेट्समुळे आता व्हॉट्सॲप ग्रुप्सवरील चैटिंगचा अनुभव पूर्णपणे बदलणार असून, ग्रुप मॅनेज करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे. जाणून घेऊया या चार भन्नाट फीचर्सबद्दल सविस्तर:
१. आता मेसेज राहील कायमस्वरूपी ‘पिन’ (Permanent Message Pinning)
याआधी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एखादा महत्त्वाचा मेसेज २४ तास, ७ दिवस किंवा जास्तीत जास्त ३० दिवसांपर्यंतच पिन करून ठेवता येत होता, त्यानंतर तो ऑटोमॅटिक हटायचा. पण आता नव्या अपडेटनुसार, युजर्स महत्त्वाचे मेसेज ‘कायमस्वरूपी’ (Forever) पिन करू शकतील. जोपर्यंत तुम्ही स्वतः तो मेसेज अनपिन करत नाही, तोपर्यंत तो ग्रुपच्या सर्वात वर दिसेल. त्यामुळे महत्त्वाची माहिती कधीही गहाळ होणार नाही.
२. नवीन सदस्यांसाठी ‘चैट हिस्ट्री शेअरिंग’ (Chat History Sharing)
नव्या सदस्याने ग्रुप जॉईन केल्यानंतर त्याला मागील घडामोडी किंवा जुने मेसेज समजावून सांगणे हे एक मोठे आव्हान असते. आता यावर तोडगा निघाला आहे. ग्रुप ॲडमिन किंवा मॅनेजर आता एखादी नवीन व्यक्ती ग्रुपमध्ये समाविष्ट झाल्यानंतरही तिच्यासोबत अलीकडची चॅट हिस्ट्री शेअर करू शकतात. विशेष म्हणजे, हे सर्व मेसेज नेहमीप्रमाणे पूर्णपणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड (End-to-End Encrypted) आणि सुरक्षित राहतील.
३. विशिष्ट ग्रुपसाठी ‘ग्रुप स्टेटस’ (Group Status)
तुम्हाला तुमचे स्टेटस सगळ्यांना न दाखवता फक्त एखाद्या विशिष्ट ग्रुपच्या सदस्यांसोबतच शेअर करायचे असेल, तर हे नवीन फिचर तुमच्यासाठीच आहे. याच्या मदतीने तुम्ही फक्त एका विशिष्ट ग्रुपसाठी ‘ग्रुप स्टेटस’ ठेवू शकता. नेहमीच्या स्टेटसप्रमाणेच हे २४ तासांनंतर आपोआप नाहीसे होईल. यावर ग्रुपमधील इतर सदस्य रिॲक्ट करू शकतात आणि स्वतःचे स्टेटसही यात जोडू शकतात.
४. महत्त्वाचे मेसेज शोधणे चिमूटभर काम – ‘मेंशन फिल्टर’ (Mentions Filter)
मोठ्या ग्रुप्समध्ये शेकडो मेसेज आल्यामुळे बऱ्याचदा आपल्याला कोणी टॅग (Mention) केले आहे हे शोधणे कठीण होते. हीच अडचण दूर करण्यासाठी व्हॉट्सॲपने ‘चैट/मेंशन फिल्टर’ आणले आहे. जेव्हा तुम्ही हा फिल्टर वापराल, तेव्हा फक्त तेच मेसेज वेगळे दिसतील ज्यात तुम्हाला पर्सनली टॅग केले गेले आहे किंवा तुमच्या मेसेजला रिप्लाय दिला गेला आहे. यामुळे कामाचे मेसेज कधीही चुकणार नाहीत.
टीप: जर तुमच्या फोनवर हे फीचर्स अद्याप दिसत नसतील, तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवर जाऊन तुमचे व्हॉट्सॲप लगेच अपडेट करा, जेणेकरून तुम्हाला या सर्व नवीन सुविधांचा लाभ घेता येईल!








