सोलापूर,दि.२७: Solapur PM Kisan 24th Installment: येत्या दिवाळीच्या सण-उत्सवाच्या काळात सोलापूर जिल्ह्यातील बळीराजासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील तब्बल ५ लाख १५८ पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे.
या विशेष दिवशी म्हणजेच शुक्रवारी हे पैसे खात्यात जमा होणार असून, ऐन सण-उत्सवाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
या अटी पूर्ण केल्यामुळे हप्त्याचा मार्ग मोकळा
जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक अटी पूर्ण झाल्यामुळे हा निधी वितरित केला जात आहे.
शेतकऱ्यांचे आधार ऑथेंटिकेशन, लँड सीडिंग म्हणजेच जमीन नोंदणी आणि ई-केवायसी या सर्व अटी वेळेत पूर्ण झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील तब्बल ९९ टक्के पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग होण्यास कोणतीही अडचण उरलेली नाही.
तुमच्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
जिल्ह्यातील एकूण ५ लाख १७ हजार ६२४ शेतकऱ्यांपैकी ५ लाख १५८ शेतकरी या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत.
तालुकानिहाय पात्र शेतकऱ्यांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
करमाळा: ६१,२६३ शेतकरी
पंढरपूर: ५९,२१० शेतकरी
सांगोला: ५६,८५६ शेतकरी
माळशिरस: ५५,८०८ शेतकरी
माढा: ५३,०७८ शेतकरी
बार्शी: ४९,२०८ शेतकरी
अक्कलकोट: ४०,२०८ शेतकरी
मोहोळ: ३९,२०१ शेतकरी
मंगळवेढा: ३८,७७६ शेतकरी
दक्षिण सोलापूर: ३१,७३९ शेतकरी
उत्तर सोलापूर: १४,२५० शेतकरी
३,२५२ शेतकऱ्यांचे ई-केवायसी अद्याप बाकी!
जिल्ह्यात अद्यापही सुमारे १ टक्के म्हणजेच ३,२५२ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे. यामध्ये सर्वाधिक १,०८० शेतकरी एकट्या पंढरपूर तालुक्यातील आहेत.
जिल्हा कृषी अधीक्षकांचे तातडीचे आवाहन:
ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे, त्यांनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ते तातडीने पूर्ण करून घ्यावे, अन्यथा हप्ता रोखला जाऊ शकतो, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.








