Home सोलापूर वार्ता महात्मा फुले जन्म द्विशताब्दीनिमित्त रविवारी कॉ. दत्ता देसाई यांचे व्याख्यान

महात्मा फुले जन्म द्विशताब्दीनिमित्त रविवारी कॉ. दत्ता देसाई यांचे व्याख्यान

0
महात्मा जोतिबा फुले-दत्ता देसाई

सोलापूर,दि.१५: थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जन्म द्विशताब्दीनिमित्त सुरू असलेल्या ‘प्रबोधनपर्व’ उपक्रमांतर्गत येत्या रविवारी (१८ ऑक्टोबर) व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफले जाणार आहे. पुण्यातील ख्यातनाम विचारवंत कॉ. दत्ता देसाई यांचे या प्रसंगी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले असून, ‘महात्मा फुले आणि सांस्कृतिक संघर्ष’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.

हा कार्यक्रम डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सायंकाळी ६ वाजता सुरू होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी राज्य सचिव तथा माजी प्राचार्य दादा चांदणे हे असणार आहेत, अशी माहिती महात्मा फुले जन्म द्विशताब्दी समितीने दिली आहे.

कॉ. दत्ता देसाई यांचा परिचय:

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ. दत्ता देसाई यांनी १९९० च्या दशकात बँकेतील नोकरी सोडत आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यासाठी समर्पित केले आहे. त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध ‘समाज विज्ञान अकादमी’चे सचिव म्हणून दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय, ‘भारत ज्ञानविज्ञान समिती’ आणि ‘भारतीय जनविज्ञान आंदोलन’ आदी माध्यमांतून त्यांनी साक्षरता, जनवाचन आंदोलन आणि दुष्काळ निर्मूलन यांसारख्या चळवळी प्रभावीपणे उभ्या केल्या आहेत.

त्यांच्या लेखणीतून ‘आधुनिकतेचे आगमन – युरोपकेंद्री इतिहासाचा जागतिक विचार’, ‘जलयुद्ध की क्रांती’ आणि ‘महाराष्ट्रातील विकासाची दिशा – हवी नवी मळवाट’ ही पुस्तके प्रसवली आहेत. तसेच, त्यांनी ‘बदलता भारत’ या दोन खंडांमधील बाराशे पानांच्या महत्त्वाच्या ग्रंथाचे यशस्वी संपादनही केले आहे.

संयोजन समितीचे आवाहन:

या कार्यक्रमाप्रसंगी संयोजन समितीचे अध्यक्ष तथा माजी प्राचार्य नरेश बदनोरे, उपाध्यक्ष प्रा. एम. आर. कांबळे, लक्ष्मीदास सोनकवडे, कार्याध्यक्ष शंकर पाटील, कोषाध्यक्ष ॲड. गोविंद पाटील आणि सचिव ॲड. मनीष गडदे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. सोलापूरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रबोधनाच्या जागरात सामील व्हावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

वर्षभर चालणार विविध उपक्रम:

महात्मा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त समितीच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधन पर्वात दर महिन्याला एका व्याख्यानाचे आयोजन केले जाते. यापूर्वी या मालिकेत प्रा. डॉ. दीपक पवार, प्रा. उमेश बगाडे आणि प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.