Home महाराष्ट्र ‘समाजाचा विश्वासघात करणार नाही!’ जरांगेंच्या अश्रूंतून पेटला मराठा आरक्षणाचा अंगार; आझाद मैदानावर...

‘समाजाचा विश्वासघात करणार नाही!’ जरांगेंच्या अश्रूंतून पेटला मराठा आरक्षणाचा अंगार; आझाद मैदानावर ठिय्या देण्यावर ठाम

0

जालना,दि.१५: मराठा आरक्षणाच्या आरपारच्या लढ्यासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अखेर अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने कूच केले आहे. आझाद मैदानावर आंदोलन करण्याच्या ठाम निर्धाराने उपोषणाची जागा सोडून ते रणांगणात उतरले आहेत. मात्र, अंतरवाली सराटी सोडताना जरांगे पाटील अत्यंत भावूक झाले. गाडीत बसताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले, पण तरीही मराठा समाजाच्या भविष्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची जिद्द त्यांच्या शब्दांमधून स्पष्टपणे झळकली.

‘मला मारून टाकण्याचा कट, पण शरण जाणार नाही’

प्रवासाला सुरुवात करताना एका वृत्तवाहिनीशी बोलताना जरांगे म्हणाले, “माझ्या समाजाच्या लेकरांपेक्षा मला जगात दुसरं काहीही मोठं नाही. माझी मुलं, माझा समाज आज संकटात आहे आणि त्यांच्या न्यायासाठीच मी मुंबईला चाललोय. सरकारला वाटतंय मी त्यांच्यापुढे झुकलो पाहिजे, पण माझ्या समाजाचा विश्वासघात करून मी कधीही माघार घेणार नाही. मला संपवण्याचा, मारून टाकण्याचा कट रचला जात आहे; पण मी आझाद मैदानावर जाण्यावर ठाम आहे. शरीर साथ देत नाहीये, पोटात अन् पायात वेदनेची आग होत आहे, तरीही मराठा आरक्षणाची पूर्ण अंमलबजावणी झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही.”

‘पक्षांपेक्षा समाजावर प्रेम करा; न्यायदेवतेवर विश्वास ठेवा’

मराठा बांधवांना शांततेचे आवाहन करत जरांगे पाटील पुढे म्हणाले, “माझं प्रत्येक मराठ्याला सांगणं आहे की सर्वांनी शांतता बाळगा. सरकारने मला चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न केलाय, पण तुम्ही माझी ढाल बनून सोबत राहा. उद्या मी जिवंत राहीन ना राहीन, पण तुम्ही समाजाची ताकद वाढवा. राजकीय पक्षांपेक्षा आपल्या समाजावर जीव लावा. न्यायालयाने आपल्याला न्याय द्यावा, हाच आमचा विश्वास आहे आणि तीच आमची परवानगी आहे. मला मरायचं असेल तर मरू द्या, पण आरक्षण मिळवल्याशिवाय थांबणार नाही.”

मुंबई पोलिसांकडे तिसऱ्यांदा परवानगीचा अर्ज

दुसऱ्या बाजूला, मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी जरांगे यांच्या टीमकडून मुंबई पोलिसांकडे तिसऱ्यांदा अर्ज सादर करण्यात आला आहे. यापूर्वी दोन वेळा परवानगी नाकारण्यात आल्यानंतर, आता नवीन अर्जात सर्व नियम व अटी मान्य करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. १८ सप्टेंबर रोजी ५० कार्यकर्त्यांसह ठरलेल्या वेळेतच हे आंदोलन केले जाईल, असे पत्रात नमूद आहे.

दरम्यान, आगामी गणेशोत्सव आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता, पोलीस प्रशासनाकडून आंदोलनाला परवानगी मिळण्याची शक्यता कमी वर्तवली जात आहे. सण-उत्सवाच्या काळात पोलिसांवर ताण पडू नये म्हणून गणेशोत्सवानंतरच आंदोलनांना परवानगी देण्याचे धोरण प्रशासन आखत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, प्रशासकीय अडथळे बाजूला सारत मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाल्याने मराठा आरक्षणाचा संघर्ष आता आणखी तीव्र व निर्णायक वळणावर पोहोचला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.