मुंबई,दि.१०: महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या दफनभूमीची मागणी पूर्ण करण्यासाठी वन विभागाची जागा तातडीने उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी केली आहे. यासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सोलापूरचे माजी आमदार व लिंगायत नेते शिवशरण अण्णा पाटील आणि अभ्यासक डॉ. बसवराज बगले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वनमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील प्रत्येक गावात लिंगायत समाजासाठी स्वतंत्र दफनभूमी मिळण्याची मागणी केली होती. यावर वनमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन अंमलबजावणीचे आदेश दिले.
निर्णयातील प्रमुख बाबी:
वनजमिनीचे हस्तांतरण: ज्या गावांमध्ये दफनभूमीसाठी पुरेशी जागा नाही तसेच गायरान किंवा गावठाणाची जमीन उपलब्ध नाही, तेथे जवळच असलेली राखीव वनजमीन ग्रामपंचायतींकडे वर्ग केली जाईल.
परंपरेचा आदर: लिंगायत धर्मातील अंतिम संस्काराच्या वेगळ्या पद्धतीचा विचार करून, मागणी येताच तातडीने जमीन देण्यासाठी वन विभाग कटिबद्ध असेल.
इतर महत्त्वाच्या मागण्यांवर सूचना:
या बैठकीत शिष्टमंडळाने खालील मुद्द्यांवरही चर्चा केली:
जुळे सोलापूर जमीन प्रश्न: कंबर तलावाजवळील २२ गृहनिर्माण संस्थांच्या नागरिकांना वनजमीन हस्तांतरित करून मालकी हक्क देणे.
काशी विश्वनाथ मंदिर: लिंगपूजा करणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र रहदारीचा मार्ग तयार करणे.
गुरुदेव समाजसेवा मंडळ: धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी स्वतंत्र जागेचा ताबा देणे.
या सर्व प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याचे आदेश वनमंत्र्यांनी दिले. या बैठकीस सोलापूरचे उपवनसंरक्षक कुलराजसिंह, कोल्हापूरचे लिंगायत नेते धनंजय महाजन, मदन पोलके आणि गंगाधर स्वामी उपस्थित होते.








