मुंबई,दि.७: देशातील मुख्य प्रश्न आणि आर्थिक परिस्थितीवरून सामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आगामी गणेशोत्सवाच्या काळात दंगली घडवून आणण्याचे मोठे कारस्थान रचले जात असल्याचा खळबळजनक दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला आहे. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
मूळ समस्यांवरून लक्ष हटवण्याचे षडयंत्र
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सत्ताधारी पक्षावर जोरदार निशाणा साधला. “सध्या देशाची आर्थिक अवस्था दयनीय असून महागाई, बेरोजगारी आणि उद्योजकांचे देशाबाहेर जाणे यांसारखे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या मूळ समस्यांवर नागरिकांनी प्रश्न विचारू नयेत म्हणूनच धार्मिक उन्माद आणि द्वेष पसरवला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. आगामी गणेशोत्सवादरम्यान केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात जाणीवपूर्वक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
सुजाण नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
समाजात तणाव वाढवून तरुणांना भडकावण्याचे काम काही यंत्रणा करत असल्याचे सांगत त्यांनी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील सुजाण नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले. “कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. दंगलींमध्ये दोन्ही बाजूंच्या निष्पाप मुलांचे नुकसान होते आणि मूळ मुद्द्यांपासून सर्वांचेच लक्ष विचलित होते,” असे ते म्हणाले.
भाषा आणि भाषिक वादावर भाष्य
अमराठी भाषिकांकडून जाणीवपूर्वक चिथावणीखोर विधाने करून घेऊन मराठी माणसाला वादात अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. अशा चिथावणीखोर प्रकारांकडे दुर्लक्ष करून संयम बाळगण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना व नागरिकांना केले.








