Home विज्ञान आणि तंत्रज्ञान MRI: रुग्णालयांमधील एमआरआय मशीन कधीच बंद का केली जात नाही?

MRI: रुग्णालयांमधील एमआरआय मशीन कधीच बंद का केली जात नाही?

0

सोलापूर,दि.७: : MRI: मोठ्या रुग्णालयांमध्ये, टेस्टिंग लॅब्स आणि स्कॅनिंग सेंटर्समध्ये एमआरआय (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग) मशीन बसवलेली असते. ही मशीन एकदा सुरू केल्यानंतर ती कधीही बंद केली जात नाही, हे पूर्णपणे सत्य आहे. ही मशीन सतत सुरू ठेवण्यामागील नेमके कारण काय आहे, ते आज आपण जाणून घेऊया.

एमआरआय मशीन बंद करणे हे घरातील एखाद्या विजेचे बटण बंद करण्याइतके सोपे नसते. बहुतेक वैद्यकीय उपकरणे वीजपुरवठा खंडित केल्यावर किंवा प्लग काढल्यावर लगेच बंद होतात. परंतु, एमआरआय स्कॅनर बंद करण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि खर्चिक असते. ही मशीन बंद करून पुन्हा सुरू करण्यासाठी लाखांचा खर्च येतो. त्यामुळे ही मशीन कधीच बंद केली जात नाही. या मशीनची कार्यप्रणाली आणि तंत्रज्ञानच यामागील मुख्य कारण आहे.

लिक्विड हेलियम आणि सुपरकंडक्टिंग मॅग्नेट

एमआरआय मशीनमध्ये शक्तिशाली सुपरकंडक्टिंग मॅग्नेट्स (अतिसंवाहक चुंबकीय कॉइल्स) असतात. हे चुंबक नेहमी अत्यंत कमी तापमानावर म्हणजे ‘ॲब्सोल्युट झिरो’जवळ (-२६९ अंश सेल्सिअस) थंड ठेवावे लागतात. त्यांना थंड ठेवण्यासाठी लिक्विड हेलियम (द्रवरूप हेलियम) वापरला जातो. एका विशेष क्रायोजेनिक सरक्युलेशन सिस्टीमद्वारे लिक्विड हेलियम या चुंबकांना सतत थंड ठेवण्याचे काम करतो, ज्यामुळे मशीन सतत सुरू ठेवावी लागते.

एमआरआय मशीन बंद करणे अत्यंत खर्चिक का असते?

एमआरआय मशीन बंद करणे हे मोठे आव्हान आणि अत्यंत खर्चिक काम आहे. मशीन बंद करणे म्हणजे त्यातील शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र (मॅग्नेटिक फील्ड) पूर्णपणे नष्ट करणे होय. ही प्रक्रिया थेट किंवा अचानक करता येत नाही. तंत्रज्ञांना मशीनच्या संवेदनशील भागांना नुकसान न पोहोचवता हे चुंबकीय क्षेत्र सुरक्षितपणे कमी करावे लागते.

या नियंत्रित प्रक्रियेला ‘रॅम्प डाउन’ (Ramp Down) म्हटले जाते. यासाठी ‘मॅग्नेट पॉवर सप्लाय’ नावाच्या विशेष उपकरणाची गरज असते. ही प्रणाली चुंबकाच्या कॉइल्समधून वाहणारा विद्युत प्रवाह टप्प्याटप्प्याने आणि सुरक्षितपणे काढून घेते. यामुळे अतिसंवाहकता (Superconductivity) टिकवून ठेवणारा लिक्विड हेलियम सुरक्षित राहतो.

हेलियमची टंचाई आणि आर्थिक भुर्दंड

जगात लिक्विड हेलियमचा साठा अत्यंत मर्यादित आहे. एमआरआय मशीन अचानक किंवा चुकीच्या पद्धतीने बंद केल्यास हेलियम वायूच्या रूपात हवेत उडून नष्ट होण्याचा धोका असतो. सध्या लिक्विड हेलियमच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.

एमआरआय मशीन एकदा बंद करून ती पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी ३०,००० ते ४०,००० डॉलर्स (सुमारे २५ ते ३५ लाख रुपये) इतका प्रचंड खर्च येतो. या आर्थिक नुकसानापासून वाचण्यासाठी रुग्णालये आणि स्कॅनिंग सेंटर्स एमआरआय मशीन २४ तास सुरूच ठेवतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.