Home क्राइम सोलापूर हत्येतील जन्मठेपेच्या आरोपीला कोल्हापूर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

सोलापूर हत्येतील जन्मठेपेच्या आरोपीला कोल्हापूर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.५: एमआयडीसी अक्कलकोट रोडवरील प्रकाश अशोक चव्हाण यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी भीमाशंकर सिद्राम झळके याला कोल्हापूर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत प्रकाश चव्हाण आणि आरोपी भीमाशंकर यांच्यात भिशीच्या पैशांच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. २४ जुलै २०१७ रोजी दुपारी प्रकाश आपल्या कपड्यांच्या दुकानात एकटा असताना त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली होती. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी भीमाशंकर व त्याच्या साथीदाराला अटक केली होती. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

या शिक्षेविरोधात भीमाशंकर याने उच्च न्यायालयात अपील दाखल करत जामिनासाठी अर्ज केला होता. सुनावणीदरम्यान आरोपीचे वकील ॲड. रितेश थोबडे यांनी असा युक्तिवाद केला की, सरकारी पक्षाचा मुख्य पुरावा हा केवळ सीसीटीव्ही फुटेजवर अवलंबून आहे आणि प्रत्यक्ष साक्षीदारांच्या ओळखीबाबत कागदोपत्री पुराव्यांशी पूर्ण सुसंगतता दिसून येत नाही.

हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने २५,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर भीमाशंकरचा जामीन मंजूर केला. या प्रकरणात अर्जदाराच्या बाजूने ॲड. रितेश थोबडे तर सरकारी पक्षाकडून ॲड. अश्विनी टक्कळकर यांनी बाजू मांडली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.