अंतरवली सराटी,दि.३१: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि राजकीय परिस्थितीवर अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. “जेलमध्ये जाणारे लोक ठरावीक गटात गेले की चित्र बदलतं. मग तुम्ही ७५ टक्के किंवा २००० कोटींचा कितीही घोटाळा करा, तुम्हाला जेल होणार नाही. सध्या देशात दोन प्रकारची संविधाने चालू आहेत,” असा थेट घणाघात जरांगे पाटील यांनी केला. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून, त्यांनी समर्थकांना मुंबईत दाखल होण्यासाठी नवी रणनीती जाहीर केली आहे.
शासनावर निशाणा, पोलिसांशी सहकार्याचे आवाहन
राजकीय घडामोडींवर भाष्य करताना जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, आंदोलकांचे लक्ष्य हे सरकार आहे. “आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयांकडे बघायचे आहे, त्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतले तरी घाबरू नका आणि त्यांना त्रास देऊ नका,” असे आवाहन त्यांनी मराठा समर्थकांना केले.
‘झाकली मूठ’ ठेवून मुंबईत दाखल होण्याचा प्लॅन
आंदोलन यशस्वी करण्यासाठी जरांगे पाटील यांनी रणनीतिक मार्ग सांगितला आहे. ५ ते ६ सप्टेंबरपासूनच समर्थकांनी गाड्यांवर झेंडे न लावता शांततेने मुंबईकडे निघायचे आहे. १२ ते २० सप्टेंबर या कालावधीत मुंबईत राहण्याचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
मुंबईतील मराठा बांधवांच्या घरी मुक्काम
“मुंबई, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील लाखो मराठा बांधव तसेच दोन-तीन लाख माथाडी कामगार मुंबईत राहतात. समर्थकांनी थेट आझाद मैदान किंवा ‘वर्षा’ बंगल्यावर न जाता आधी आपल्या नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या घरी मुक्काम करावा. एका घरात ४ ते ५ लोक राहिल्यास मुंबईत पाहता पाहता २५ लाखांची गर्दी जमा होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रशासनाला संशय न येऊ देता टप्प्याटप्प्याने मुंबईत पोहोचून आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.








