मुंबई,दि.२९: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या आगामी ‘Belonging: A Journey of Love’ या आत्मचरित्रावरून देशातील राजकीय आणि साहित्यिक वर्तुळात नवा पेच निर्माण झाला आहे. पुस्तकातील काही राजकीयदृष्ट्या संवेदनशील मुद्द्यांवरून लेखिका सोनिया गांधी आणि प्रसिद्ध प्रकाशन संस्था ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ (PRHI) यांच्यात मतभेद झाले आहेत. त्यामुळे या पुस्तकाचे भारतातील प्रकाशन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे पुस्तक १० नोव्हेंबरला जगभरात उपलब्ध होणार आहे.
या ३ मुद्द्यांवरून आक्षेप
सूत्रानुसार, हस्तलिखिताची (Manuscript) तपासणी करताना पेंग्विन इंडियाने तीन मुद्द्यांवर आक्षेप घेत बदल सुचवले होते:
पंतप्रधान नरेंद्र मोदी: केंद्र सरकारचे कामकाज आणि पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांवरील रोखठोक मते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS): संघाची विचारसरणी व राजकीय हस्तक्षेपावर केलेली टिप्पणी.
चीन सीमावाद: भारत-चीन सीमेवरील स्थितीबाबत मांडलेले विचार.
‘पेंग्विन वर्ल्डवाइड’ला या मजकुरावर कसलीही अडचण नव्हती; मात्र भारतातील कायदेशीर व राजकीय परिस्थितीचा विचार करून पेंग्विन इंडियाने हे भाग वगळण्याचा किंवा बदलण्याचा सल्ला दिला होता. सोनिया गांधी यांनी आपल्या हस्तलिखितातील मजकुरात कोणताही बदल करण्यास नकार दिला.
पेंग्विन इंडियाचा युक्तिवाद
वाद निर्माण झाल्यानंतर पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने स्पष्टीकरण प्रसिद्ध केले: “आम्ही या पुस्तकाचे भारतातील प्रकाशक नाही. सोनिया गांधींनी बदल स्वीकारले नाहीत म्हणून पुस्तक रद्द केले, हा दावा चुकीचा आहे. पुस्तकातील तथ्यांची पडताळणी करणे आणि योग्य बदल सुचवणे ही प्रकाशकाची जबाबदारी असते. आम्ही हे पुस्तक प्रकाशित करण्यास उत्सुक होतो, मात्र लेखकासोबतच्या गोपनीय संवादावर यापेक्षा अधिक बोलणे योग्य ठरणार नाही.”
परदेशात प्रकाशन यथास्थित
भारतात अडथळा निर्माण झाला असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुस्तकाच्या प्रकाशनावर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. अमेरिकेत पेंग्विन समूहाचीच शाखा असणारे ‘अल्फ्रेड ए. नोपफ’ (Alfred A. Knopf) हे प्रसिद्ध प्रकाशन हे पुस्तक ठरलेल्या वेळीच बाजारात आणणार आहे.








