मुंबई,दि.२८: नवी मुंबईतील खारघर परिसरात हजारो ‘SIR’ (स्पेशल समरी रिव्हिजन) फॉर्मच्या झेरॉक्सवरून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. एका स्थानिक झेरॉक्स सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकृत शासकीय फॉर्मची छपाई सुरू असल्याची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या कार्यकर्त्यांनी तेथे धडक दिली. या वेळी झेरॉक्स काढणारा तरुण भाजपचा युवा पदाधिकारी असल्याचा दावा करत ठाकरे गटाने त्याला जाब विचारला, ज्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी आणि झटापट झाली.
पोलिसांची कारवाई आणि ठाकरे गटाचा गंभीर आरोप
घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी घटनास्थळावरून सर्व संशयास्पद ‘SIR’ फॉर्म जप्त केले असून संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. मात्र, पोलीस ठाण्यात आणल्यानंतर काही वेळातच तो भाजप पदाधिकारी पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून पसार झाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने हे शासकीय फॉर्म या तरुणाकडे कसे आले आणि ते झेरॉक्स करण्याचे मुख्य कारण काय होते, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
विरोधकांची भाजपसह निवडणूक आयोगावर टीका
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, ही मोहीम केवळ भाजपची मतपेढी मजबूत करून विरोधी पक्षांच्या मतदारांची नावे वगळण्यासाठी चालवली जात असल्याचा संशय येतो. त्यामुळे या मोहिमेचे नाव बदलून ‘Special BJP Voter Confirmation’ (SBVC) ठेवायला हवे, असा टोला लगावताना त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.








