मुंबई,दि.२२: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) देशभरातील बँकिंग व्यवस्था अधिक सुरक्षित आणि जलद करण्यासाठी चेकबुकशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, येत्या १ जानेवारी २०२७ पासून सर्व बँकांच्या चेकवर ‘अल्फा-न्यूमरिक कोड’ असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व बँक ग्राहकांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत आपले जुने चेकबुक बदलून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अनेक सार्वजनिक आणि खाजगी बँकांनी नवीन कोड असलेली चेकबुक वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, ग्राहकांना ईमेल व एसएमएसद्वारे तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे.
₹५० हजारांवरील व्यवहारांवर होणार परिणाम
बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबर २०२६ नंतर ५० हजार रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचे जुने चेक (ज्यावर नवीन अल्फा-न्यूमरिक कोड नसेल) स्वीकारले जाणार नाहीत. संभाव्य आर्थिक अडचणी आणि चेक अनादर (Bounce) टाळण्यासाठी ग्राहकांनी वेळेत नवीन चेकबुक मिळवणे आवश्यक आहे.
काय आहे अल्फा-न्यूमरिक कोड आणि त्याचे फायदे?
अक्षर आणि अंकांचा मेळ: या कोडमध्ये अक्षरे (Alphabets) आणि अंक (Numbers) दोन्ही असतात, ज्यामुळे प्रत्येक चेकला एक युनिक डिजिटल ओळख मिळते.
फसवणुकीला आळा: या प्रणालीमुळे चेकमधील छेडछाड आणि बनावट (बोगस) चेकद्वारे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांचा धोका पूर्णपणे टळेल.
जलद क्लिअरिंग: ट्रंकेशन सिस्टीमद्वारे कागदी चेकचे त्वरित डिजिटल रूपात रूपांतर होते. त्यामुळे चेक प्रत्यक्ष शाखेत न पाठवता वेगाने वटवले जातात.
चेकबुक शुल्कात तफावत
नवीन चेकबुकसाठीचे शुल्क बँकेच्या धोरणावर आणि ग्राहकांच्या खात्याच्या प्रकारावर अवलंबून असेल. उदाहरणार्थ, बँक ऑफ इंडिया बचत खातेदारांना वर्षाला २५ पानांचे एक चेकबुक मोफत देते; त्यानंतर अतिरिक्त पानासाठी प्रति पान ५ रुपये शुल्क आकारले जाते. इतर बँकांचे शुल्क यापेक्षा वेगळे असू शकते.
वेळेत नवीन चेकबुक न घेतल्यास नवीन वर्षात मोठे आर्थिक व्यवहार अडकण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी त्वरित आपल्या बँकेशी संपर्क साधावा.








