सोलापूर,दि.२२: बार्शी येथील तालुका क्रिकेट असोसिएशनच्या उन्हाळी शिबिरात शिबिरार्थीचा लोखंडी रोलरखाली दबून मृत्यू झाल्याच्या प्रकरणात क्रिकेट कोच विवेक गजेंद्र दुगन यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे.
बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, कोच दुगन यांनी शिबिरार्थीला लोखंडी रोलर ओढण्यास सांगितले होते. या दरम्यान रोलर खाली आल्याने शिबिरार्थीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी दुगन यांना अटक केली होती, तर बार्शी स्थानिक न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
स्थानिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. ही घटना अत्यंत दुर्दैवी व अपघाती स्वरूपाची असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा चुकीच्या गृहीतकावर आधारित दाखल करण्यात आला आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.
खंडपीठाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर विवेक दुगन यांची जामिनावर मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने व ॲड. मिहीर मोंडकर यांनी, तर सरकारी पक्षातर्फे ॲड. महालक्ष्मी गणपती यांनी काम पाहिले.








