नवी दिल्ली,दि.२७: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) ऐतिहासिक आंदोलनानंतर आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर देशातील तरुणाईचा राजकीय दबाव भलताच वाढलेला दिसत आहे. CJP च्या या अभूतपूर्व यशावरून प्रेरणा घेत आता ‘E20 जनता पार्टी’ (E20JP) नावाचा नवीन गट थेट मैदानात उतरला आहे.
पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याच्या (E20 Petrol) केंद्र सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध करत, वाहनधारकांना १०० टक्के शुद्ध पेट्रोल खरेदी करण्याचा कायदेशीर पर्याय उपलब्ध करून द्यावा, या मुख्य मागणीसाठी आता जंतर-मंतरवर उपोषण सुरू केले जाणार आहे.
सोशल मीडियावर E20 जनता पार्टीचे पेज सुरू होताच अवघ्या काही तासांत इन्स्टाग्रामवर याचे फॉलोअर्स लाखांच्या घरात पोहोचले आहेत. CJP प्रमाणेच आता E20JP लाही देशातील वाहनधारक आणि तरुणांचा प्रचंड पाठिंबा मिळताना दिसत आहे.
E20 पेट्रोलला विरोध का?
E20 जनता पार्टीच्या आंदोलकांनी आणि संस्थापकांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत:
इंजिनचे नुकसान: २० टक्के इथेनॉल मिश्रणामुळे जुन्या आणि नवीन वाहनांच्या इंजिनचे मोठे नुकसान होत असून बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे.
मायलेजमध्ये मोठी घट: इंधनाची गुणवत्ता खालावल्याने वाहनांची मायलेज क्षमता कमालीची घटली आहे.
ग्राहकांची फसवणूक: वाहनधारकांकडून पूर्ण पैसे उकळूनही त्यांना कमी दर्जाचे इंधन दिले जात असल्याचा दावा या पक्षाने केला आहे.
‘E20 जनता पार्टी’च्या मुख्य मागण्या:
1. १००% शुद्ध पेट्रोलचा पर्याय: पेट्रोल पंपांवर ग्राहकांना E20 ऐवजी १०० टक्के शुद्ध पेट्रोल (Unblended Petrol) निवडण्याचा स्पष्ट आणि कायदेशीर पर्याय मिळावा.
2. किमतीत सवलत: इथेनॉलचा उत्पादन खर्च कमी असल्याने E20 मिश्रित पेट्रोल ग्राहकांना स्वस्त दरात विकले जावे.
3. पारदर्शक लेबलिंग: प्रत्येक इंधन नोझलवर किती टक्के इथेनॉल आहे, याचे स्पष्ट फलक पंपांवर लावले जावेत.
CJP ने ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या ताकदीवर सरकारला नमवून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या, त्याच धर्तीवर आता E20JP ने जंतर-मंतर परिसरात आपले आंदोलन तीव्र केले आहे. “हा देशातील करोडो वाहनधारकांच्या आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या खिशावर मारला जाणारा थेट दरोडा असून, मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नाही,” असा इशारा या नव्या पक्षाने दिला आहे.








