Home सोलापूर वार्ता ॲड. मिलिंद थोबडे यांचा सोलापूर बार असोसिएशनतर्फे भव्य सत्कार

ॲड. मिलिंद थोबडे यांचा सोलापूर बार असोसिएशनतर्फे भव्य सत्कार

0

सोलापूर,दि.२६: बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा च्या सदस्यपदी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवल्याबद्दल ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित हा सोहळा विशेष सरकारी अभियोक्ता आणि राज्यसभा खासदार पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी ॲड. मिलिंद थोबडे यांच्या तीन कार्यकाळांतील उल्लेखनीय कामांचा आढावा घेत उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर बारचे उपाध्यक्ष ॲड. रियाज शेख यांनी ॲड. महादेव विनायक गोटे यांनी तयार केलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले, ज्यामध्ये थोबडे यांच्या कायदेशीर कारकिर्दीचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला होता.

या प्रसंगी सोलापूर विधी क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ व नामांकित वकिलांनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये ॲड. शरद पाटील, ॲड. मंगला चिंचोळकर, ॲड. श्रीनिवास क्यातम, ॲड. डी. एन. भडंगे, ॲड. संजीव सदाफुले आणि ॲड. अमोगसिद्ध साखरे यांचा समावेश होता. थोबडे यांनी नेहमीच नवोदित वकिलांना पाठबळ दिले असून राज्यातील वकिलांच्या हक्कासाठी बार कौन्सिलमध्ये बजावलेली भूमिका कौतुकास्पद असल्याचे वक्त्यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना ॲड. मिलिंद थोबडे यांनी सोलापूरच्या वकील वर्गाने दाखवलेला विश्वास अत्यंत मोलाचा असल्याचे सांगत हा विजय संपूर्ण विधी क्षेत्राचा असल्याचे नमूद केले. भविष्यातही वकिलांच्या कल्याणासाठी आणि न्यायालयाच्या बळकटीकरणासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.

त्यानंतर ॲड. उज्ज्वल निकम यांनी अध्यक्षीय भाषणात थोबडे यांच्या कामाची प्रशंसा करत सोलापूर बार असोसिएशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या मंचावर ॲड. मिलिंद थोबडे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुचिता थोबडे आणि सोलापूर बार असोसिएशनच्या सहसचिवा ॲड. मीरा प्रसाद उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. मनोज पामुल व ॲड. मलसिद्ध देशमुख यांनी केले, तर बारचे सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याला सोलापूर शहर व जिल्ह्यातील ज्येष्ठ, महिला आणि नवोदित वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.