मुंबई,दि.२६: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशभरात राजकीय भूकंप झालेला असतानाच, आता ग्लॅमर विश्वातून एका अनपेक्षित वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. नीट (NEET) प्रकरणावरून सुरू असलेल्या अभूतपूर्व आंदोलनानंतर ‘सीजेपी’ने मोठा विजय साजरा केला असला, तरी प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिने या संपूर्ण मोहिमेवरच थेट सवाल उपस्थित केले आहेत. एका बड्या मंत्र्याचे नाव घेत तिने ‘CJP’ आणि कार्यकर्ते अभिजीत दीपके यांना थेट आव्हान दिल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.
“पंजाबमध्ये आंदोलन कधी करणार?” – श्वेताचा सडेतोड सवाल
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रियांचा पाऊस पडत असताना श्वेता तिवारीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. अभिजीत दीपके यांचा हा व्हिडिओ शेअर करत श्वेताने अत्यंत खोचक शब्दांत विचारले, “पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? आणि कॉक्रोच जनता पार्टी तिथे आंदोलनासाठी कधी पाऊल ठेवणार आहे?” तिच्या या आक्रमक पोस्टमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत.
नेमका काय होता वादग्रस्त व्हिडिओ?
श्वेताने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अभिजीत दीपके आंदोलनाच्या ताकदीचा दावा करताना दिसतात. ते म्हणाले होते की, “केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा ही साधी गोष्ट नाही. कोणतीही सत्ता किंवा मंत्री जर योग्य काम करत नसेल, तर एकत्र आलेली जनता आणि विद्यार्थी त्याला खुर्चीवरून खाली खेचू शकतात, हेच या आंदोलनाने दाखवून दिले आहे.” दीपके यांच्या याच दाव्यानंतर श्वेताने पंजाबच्या मुद्द्यावरून त्यांना घेरले आहे.
जंतर-मंतर ते संसद… असे झुकले होते सरकार
NEET पेपरफुटीच्या धक्कादायक प्रकरणानंतर सुमारे २० निष्पाप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. याविरोधात दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलनाची ठिणगी पडली. विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केले, तर २० जुलै रोजी जंतर-मंतरवरून संसदेवर काढलेल्या धडक मोर्चाने सरकारची झोप उडवली. चौफेर वाढलेल्या दबावामुळे अखेर शनिवारी धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता.
मात्र, आता श्वेता तिवारीने दिलेल्या या ओपन चॅलेंजवर सीजेपी आणि अभिजीत दीपके काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








