सोलापूर,दि.१४: सोलापूरकरांच्या हक्काच्या आणि बहुप्रतीक्षित आयटी पार्क (IT Park) प्रकल्पाबाबत एक मोठी घडामोड समोर आली आहे. होटगी रोडवरील ६८ एकर जागेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असतानाच, आता या जागेच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी तज्ज्ञ आणि उद्योजकांच्या अहवालानंतरच अंतिम निर्णय घेणार असल्याचे जाहीर केल्यामुळे, जिल्हा प्रशासनाने आता अवघ्या आठ दिवसांत नवीन पर्यायी जागांचा शोध घेऊन प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.
नेमका वाद आणि अडचण काय?
यापूर्वी जिल्हा प्रशासनाने होटगी रोडवरील जलसंपदा विभागाची जागा निश्चित केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथेच आयटी पार्क उभारण्याची घोषणा केली होती, तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही याच जागेचा आग्रह धरला होता. मात्र, उद्योगमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सोलापूरच्या उद्योजकांनी या जागेवर काही तांत्रिक आक्षेप नोंदवले आहेत:
विमानतळाची अडचण: प्रस्तावित जागेजवळच सोलापूर विमानतळ असल्याने भविष्यात आयटी पार्कच्या बहुमजली इमारतींना आणि विस्ताराला मर्यादा येऊ शकतात.
पायाभूत सुविधा: वाहतूक कोंडी आणि इतर तांत्रिक अडचणी उद्भवण्याची शक्यता उद्योजकांनी वर्तवली आहे.
उद्योगमंत्र्यांची भूमिका: “वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा आणि विस्तारक्षमता या निकषांवर तज्ज्ञ समिती आधी सखोल अभ्यास करेल. त्यांच्या व्यावसायिक अहवालानंतरच अंतिम जागेवर शिक्कामोर्तब होईल.”— डॉ. उदय सामंत, उद्योगमंत्री
महायुतीत मतभेदांची चर्चा
भाजपचे नेते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे हे होटगी रोडच्या जागेसाठी आग्रही असताना, शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आयटी पार्कच्या जागेवरून महायुतीमधील दोन पक्षांत मतभेद तर नाही ना, अशी चर्चा आता सोलापुरात रंगू लागली आहे.
प्रशासनाकडून युद्धपातळीवर हालचाली
जागेचा तिढा वाढल्यामुळे जिल्हा प्रशासन आता सतर्क झाले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून, सोलापूरच्या आसपासच्या योग्य आणि मोठ्या जागांचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. विविध ठिकाणांची पाहणी करून येत्या ८ दिवसांत एक नवा पर्यायी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे आता सोलापूरच्या आयटी पार्कला नवी जागा मिळते की होटगी रोडवरच शिक्कामोर्तब होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.








