सोलापूर,दि.१९: सोलापूर-गोवा विमानसेवा आज (शुक्रवार) पासूनच तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येणार असून, ३१ ऑगस्टनंतर ती पुन्हा सुरू केली जाईल. दरम्यान, सोलापूर-मुंबई विमानसेवा १५ सप्टेंबरपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, १६ सप्टेंबरपासून ही सेवा पूर्ववत सुरू होणार असल्याचे समजते.
पावसाळ्यात सोलापूर विमानतळ परिसरात दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी राहण्याची शक्यता असल्यामुळे दोन्ही विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. विमानतळ प्रशासकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील अडीच ते तीन महिन्यांसाठी ही उड्डाणे बंद राहतील. विमान कंपन्यांनीही आपल्या अधिकृत संकेतस्थळांवर (वेबसाईट) कमी दृश्यमानतेच्या कारणाचा उल्लेख केला आहे.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षी पावसाळ्यातच सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू करण्यात आली होती; मात्र यंदा त्याच पावसाळ्याचे कारण पुढे करत ही सेवा स्थगित करण्यात आली आहे.
वर्षभरातील काही महिन्यांसाठी विमानसेवा बंद ठेवण्याच्या या निर्णयामुळे सोलापूरकर प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. याचा फटका प्रामुख्याने व्यावसायिक, पर्यटक आणि नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसेल. सोलापूर विमानतळावरून सुरू झालेल्या सेवांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच, अचानक काही महिन्यांसाठी उड्डाणे बंद ठेवण्यात आल्याने विमानसेवेच्या सातत्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यानंतर या सेवा पुन्हा सुरू होणार असल्यास, तरी अशा वारंवार होणाऱ्या बदलांमुळे सोलापूरच्या हवाई संपर्काच्या विश्वासार्हतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.







