दि.7: उन्नाव सदरचे (Unnao Sadar MLA) भाजपचे आमदार पंकज गुप्ता (BJP MLA Pankaj Gupta) यांना एका जाहीर सभेत एका कथित शेतकरी नेत्याने मंचावर जाहीरपणे चापट मारली. आमदाराला चापट मारतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समाजवादी पक्षानेही शेअर केला आहे.
एका जाहीर सभेत भाजप आमदार पंकज गुप्ता यांना एका कथित शेतकरी नेत्याने चापट लगावली असून दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दरम्यान, आमदार गुप्ता यांनी मात्र असा कोणताच प्रकार घडला नसल्याचा दावा केला आहे.
उन्नावमधील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समाजवादी पार्टीच्या मीडिया सेलच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. त्यात लिहिले आहे की, शेतकऱ्याने मारलेली ही चापट ही भाजप आमदाराच्या तोंडावर मारलेली चापट नसून यूपीच्या भाजपशासित आदित्यनाथ सरकारची धोरणे, कुशासन आणि हुकूमशाहीला मारलेली आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओत
हा व्हिडिओ समाजवादी पक्षाच्या मीडिया सेल ट्विटरवरून प्रसिद्ध करण्यात आला आहे तो 21 सेकंदाचा आहे. यामध्ये भाजपचे उन्नाव सदरचे आमदार पंकज गुप्ता मंचावर बसलेले दिसत आहेत. सभेत आमदार गुप्ता हे व्यासपीठावर बसले असतानाच हा धक्कदायक प्रकार घडला. हातात काठी घेऊन एक व्यक्ती व्यासपीठावर पोहचली आणि कुणाला काही कळायच्या आत त्याने थेट गुप्ता यांना चापट मारली. त्यामुळे सगळेच हादरले. लगेचच पोलिसांनी या व्यक्तीला व्यासपीठावरून उतरवत स्थिती नियंत्रणात आणली. व्यासपीठावर पंकज गुप्ता यांच्यासोबत खासदार साक्षी महाराज हेसुद्धा उपस्थित होते.
आमदाराला चापट मारणारी व्यक्ती शेतकरी नेता असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचे नाव छत्रपाल असल्याचेही सांगण्यात आले. छत्रपाल यांनी भारतीय किसान युनियन या संघटनेची टोपी घातली होती. त्यांनी हे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या नाराजीचा स्फोट झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.