Solapur: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात निर्बंध लागू, महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी काढले आदेश

0

सोलापूर,दि.२५: Restrictions in Solapur: ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध (Restrictions in Maharashtra) लागू करण्यात आले आहेत. नाताळ व न्यू इअरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूर शहराकरिता प्रतिबंधात्मक आदेश (Restrictions in Solapur) काढले आहेत.

सोलापूर शहरात सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा अधिक व्यक्तींच्या एकत्रित येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल. तसंच, लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १००च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५०च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल, असे आदेश आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढले आहेत.

शहरातील उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील, असंही या आदेशात नमूद केलं आहे.

सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल.

शहरातील कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

शहरातील क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.

शहरातील उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / संस्था अथवा संघटना यांचेवर भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५. साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करणेत येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांचे विरुध्द संबंधीत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी / विभागीय अधिकारी व अधिनस्त कर्मचारी यांनी कारवाई करावी असे आयुक्त पी शिवशंकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here