बेंगलुरु,दि.२८: Bengaluru News | कर्नाटकमध्ये अखेर सत्ता परिवर्तनाची स्क्रिप्ट पूर्ण झाली असून राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री सिद्धारमैया (Siddaramaiah) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे कर्नाटक काँग्रेसमधील (Karnataka Congress) अंतर्गत सत्तासंघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धारमैया यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी कॅबिनेट मंत्र्यांसाठी एका खास ब्रेकफास्ट मीटिंगचे (Breakfast Meeting) आयोजन केले होते. या बैठकीत इडली, वडा आणि मसाला डोसा असा दाक्षिणात्य बेत होता, पण या खाण्यापिण्याच्या वातावरणात अचानक राजकीय बॉम्ब फुटला. सिद्धारमैया यांनी अत्यंत भावुक होत “मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे,” अशी अधिकृत घोषणा केली.
डीके शिवकुमार यांनी घेतले आशीर्वाद | Karnataka Congress
या नाट्यमय घडामोडींदरम्यान उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (DK Shivakumar) हे विमानतळावरून थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. तिथे दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारून ‘एकजुटीचा’ संदेश देण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, शिवकुमार यांनी सिद्धारमैया यांच्या पाया पडून (Touching Feet) त्यांचे आशीर्वाद घेतले, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
राजीनाम्याबाबत नवा ट्विस्ट!
मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) सिद्धारमैया यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, यामध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. राज्यपाल थावरचंद गहलोत हे सध्या कौटुंबिक आणीबाणीमुळे बेंगळुरूमध्ये उपस्थित नाहीत. ते शहराबाहेर असले तरी सिद्धारमैया यांचे कार्यालय राज्यपालांच्या सचिवालयाकडे आपला राजीनामा सुपूर्द करणार असल्याचे समजते. कर्नाटकातील या नव्या सत्ता बदलामुळे आता पुढील मुख्यमंत्री कोण होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.







