सोलापूर,दि.१८: Solapur Crime News: होम लोनचे हप्ते भरतो आणि कर्जाचे पुनर्गठन (Restructure) करून देतो, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची ८ लाख ६८ हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय? | Solapur Crime News
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण शिवाजी चव्हाण (रा. सैफुल, विजापूर रोड) यांचे एका गृहनिर्माण फायनान्स कंपनीत होम लोन सुरू होते. या कंपनीत ‘होम लोन रिकव्हरी’चे काम करणारा आरोपी राहुल पुदाले (रा. शेळगी, सोलापूर) याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. “तुमच्या होम लोनचे हप्ते कमी करून देतो, कर्जाचे रि-स्ट्रक्चर करतो आणि घराची जप्ती थांबवतो,” असे आश्वासन त्याने दिले होते.
अशी झाली फसवणूक
आरोपीने फिर्यादीकडून कर्जाचे हप्ते भरण्यासाठी वेळोवेळी एकूण ८,६८,७०० रुपये घेतले. मात्र, ही रक्कम फायनान्स कंपनीत जमा न करता त्याने स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. एवढेच नव्हे तर, फिर्यादीची रेनॉल्ड डस्टर कार (क्र. एम एच १३ ए झेड ७५६६) देखील हप्ते भरतो असे सांगून तो घेऊन गेला आणि ती परत केली नाही.
पोलीस कारवाई
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रवीण चव्हाण यांनी पोलिसांत धाव घेतली. सदर बाजार पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(५) आणि ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक (पोसई) पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.








