सोलापूर,दि.१५: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने जुळे सोलापूर येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात साधारण ६० महिलांनी आपली बीपी, शुगर आणि एचबी (हिमोग्लोबिन) तपासणी करून घेतली.
शिबिराचे उद्घाटन
जुळे सोलापूर येथील डॉ. वर्षा पगारे यांच्या ‘सम्यक क्लिनिक’ मध्ये हे शिबीर पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या शुभांगी शिवाजी झेंडे-कुलकर्णी आणि शुभांगी चेतन शहा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी पोलीस बॉईज असोसिएशनच्या प्रदेश उपाध्यक्ष नमिता थिटे, जिल्हा अध्यक्ष संध्या काळे आणि प्रमिला तूपलवंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
शिबिरात महिलांना मार्गदर्शन करताना डॉ. वर्षा पगारे यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच आज प्रत्येक स्त्री विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत आहे.” तसेच, वयाच्या ५० शी नंतर महिलांमध्ये होणारे शारीरिक बदल आणि मेनोपॉजमुळे येणारे नैराश्य टाळण्यासाठी समतोल आहार, व्यायाम आणि छंद जोपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. निलोफर शेख यांनी महिलांना महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन नियमित आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन केले. जिल्हा अध्यक्ष संध्या काळे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत, स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रमुख पाहुण्यांनी भगवान महावीरांच्या ‘अहिंसा परमो धर्म’ या तत्त्वावर प्रकाश टाकत, उन्हाळ्यात मुक्या प्राण्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवण्याचे आवाहन केले.
मान्यवरांचा सन्मान
या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल प्रदेश उपाध्यक्ष नमिता थिटे यांच्या हस्ते डॉ. वर्षा पगारे यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुण्यांचा सन्मान क्षितिजा गाताडे, संध्या काळे आणि प्रमिला तूपलवंडे यांनी केला.
उपस्थिती:
या कार्यक्रमाला शोभा बोबे, राजश्री तडकासे, ॲड. मानसी कुलकर्णी, ॲड. सारिका अग्निहोत्री, वर्षा अतनूरे, निर्मोही अग्निहोत्री, मयुरी शहा, आयेशा शेख, सुप्रिया कुलकर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार सचिव शारदा मसुती यांनी मानले.








