नागपूर,दि.३०: भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या कारला नागपूरजवळ भीषण अपघात झाला असून, या अपघातातून ते थोडक्यात बचावले आहेत. सोमवारी पहाटे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी नागपूर विमानतळाकडे जात असताना त्यांच्या वाहनाला एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, खासदारांच्या कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सुदैवाने, या मोठ्या अपघातात डॉ. पडोळे यांना केवळ किरकोळ दुखापत झाली असून त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉ. प्रशांत पडोळे हे पहाटेच्या सुमारास आपल्या सुरक्षारक्षक आणि चालकासह भंडारा येथून नागपूर विमानतळाच्या दिशेने निघाले होते. नागपूर जिल्ह्यातील हल्दीराम कारखान्यासमोर आले असता, एका ट्रकने त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही डॉ. पडोळे यांनी कमालीचे प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठा दाखवली. किरकोळ जखमी अवस्थेत असूनही त्यांनी वेळ न घालवता एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली आणि नागपूर गाठले. तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ते नियोजित विमानाने दिल्लीकडे रवाना झाले.
धक्कादायक बाब म्हणजे, खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाचा गेल्या काही महिन्यांतील हा दुसरा भीषण अपघात आहे. यापूर्वीही नागपूर परिसरातच त्यांच्या गाडीला अपघात झाला होता आणि त्यावेळीही ते किरकोळ जखमी झाले होते. एकाच वर्षात दुसऱ्यांदा असा मोठा अपघात झाल्याने समर्थकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला आणि ट्रक चालकाचा यात काय दोष होता, याचा सविस्तर तपास आता पोलीस करत आहेत. सध्या खासदार सुरक्षित असून ते दिल्लीत पोहोचले आहेत.








