सोलापूर: मोबाईल किंवा इलेक्ट्रिक गाड्यांना आग लागल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील, पण आता चक्क टूथब्रशचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यूयॉर्कमधील एका ३३ वर्षीय महिलेने दावा केला आहे की, तिच्या बाथरूममध्ये ठेवलेल्या इलेक्ट्रिक टूथब्रशचा अचानक स्फोट झाला आणि त्यात आग लागली.
काय घडली नेमकी घटना?
शार्लोट बोवर्स नावाच्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती गेल्या आठ महिन्यांपासून हा ब्रश वापरत होती. घटनेच्या रात्री ती आणि तिचा जोडीदार झोपलेले असताना अचानक ब्रशचा स्फोट झाला. सुदैवाने, ज्या ठिकाणी ब्रश ठेवला होता, त्याजवळील काचेच्या स्टील फ्रेममुळे आग जास्त पसरली नाही. जर ती फ्रेम नसती, तर मोठी जीवितहानी झाली असती, अशी भीती तिने व्यक्त केली आहे.
आगीमुळे मोठे नुकसान
या अपघातामुळे संपूर्ण बाथरूममध्ये काळा धूर पसरला होता. आगीच्या ज्वाला भिंतीपर्यंत पोहोचल्या आणि एक्झॉस्ट फॅनचेही नुकसान झाले. या घटनेमुळे घराची वीजही खंडित झाली होती. बाथरूममधील धुराचा वास घालवण्यासाठी आणि भिंतींच्या डागांसाठी महिलेला विशेष पेंटवर सुमारे २६७ डॉलर्स (अंदाजे २२ हजार रुपये) खर्च करावे लागले.
कंपनीची भूमिका आणि महिलेचा पवित्रा
शार्लोटने जेव्हा कंपनीकडे तक्रार केली, तेव्हा कंपनीने तिला केवळ नवीन टूथब्रश खरेदी करण्यासाठी ४६ डॉलर्स देण्याची तयारी दर्शवली. मात्र, महिलेने स्पष्ट केले की, तिला कोणत्याही मोठ्या नुकसानभरपाईची अपेक्षा नसून केवळ दुरुस्तीसाठी आलेला खर्च मिळावा, ही तिची मागणी आहे.
या धक्कादायक अनुभवानंतर “मी आता कधीही इलेक्ट्रिक टूथब्रश वापरणार नाही, हे अत्यंत धोकादायक आहे,” असे तिने म्हटले आहे. विशेष म्हणजे, हा ब्रश घटनेच्या वेळी चार्जिंगला लावलेला नव्हता आणि तो पूर्णपणे कोरडा होता.








