मुंबई/नागपूर,दि.१८: Maharashtra Weather Update: राज्यात सध्या निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. एकीकडे उन्हाचा चटका वाढत असतानाच, दुसरीकडे अवकाळी पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) विदर्भासह राज्याच्या अनेक भागांत ‘येलो अलर्ट’ जारी केला असून, पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस; वीज पुरवठा खंडित
विदर्भातील नागपूर, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यात हवामानात अचानक बदल झाला आहे.
• गडचिरोली: जिल्ह्यात आज पहाटे ३:३० ते ४:०० च्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला असून भर उन्हाळ्यात पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे.
• अमरावती व नागपूर: गेल्या दोन दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस अखेर बरसला आहे. आज सकाळपासूनच अमरावतीसह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण असून हलक्या सरी कोसळत आहेत.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात गारपिटीचा तडाखा
केवळ विदर्भच नाही, तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने रौद्र रूप धारण केले आहे.
• सांगली: मिरज पूर्व भागात काल वादळी वाऱ्यासह प्रचंड गारपीट झाली. बेडग रोडवरील शाळूचे पीक अक्षरशः भुईसपाट झाले आहे.
• लातूर व धाराशिव: लातूरच्या निलंगा, औसा, चाकूर आणि उदगीर भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली. धाराशिवच्या लोहारा भागातही गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
• हिंगोली: जिल्ह्यात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.
शेतकरी संकटात: ‘या’ पिकांचे झाले नुकसान
या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रामुख्याने खालील पिकांवर परिणाम झाला आहे:
1. फळबागा: आंबा आणि द्राक्ष बागांना मोठा फटका.
2. रब्बी पिके: गहू, ज्वारी आणि हरभरा पिके भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.








