मुंबई,दि.१४: इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धाला आज १५ दिवस पूर्ण झाले असून, या संघर्षात आता इराणचे पारडे जड होताना दिसत आहे. इराणने केलेल्या भीषण मिसाईल हल्ल्यांमुळे इस्रायलसह अमेरिकेच्या सैन्यतळांचेही मोठे नुकसान झाले असून, यामुळे पाश्चात्य राष्ट्रांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
अमेरिकेचे मोठे नुकसान आणि रशियावर आरोप
आखाती देशांमधील अमेरिकेच्या सैन्यतळांवर इराणने अत्यंत अचूक मारा केला आहे. या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचे अनेक सैनिक मारले गेल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियावर गंभीर आरोप केले आहेत. अमेरिकेच्या मते, रशियाने त्यांच्या सैन्यतळांच्या गुप्त लोकेशन्सची माहिती इराणला पुरवली आहे. मात्र, रशियाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
काय आहे इराणचे नवे शस्त्र ‘३५९’?
युद्धाच्या १५ व्या दिवशी इराणने आपले सर्वात घातक शस्त्र ‘३५९’ मिसाईल मैदानात उतरवले आहे. हे मिसाईल ‘३५८’ या आवृत्तीचे अपग्रेडेड व्हर्जन असून त्याच्या वैशिष्ट्यांमुळे अमेरिका आणि इस्रायलला घाम फुटला आहे:
• विना रडार मारा: या मिसाईलला लक्ष्याचा वेध घेण्यासाठी रडारची गरज भासत नाही. रडारशिवाय शत्रूचे ड्रोन शोधून ते नष्ट करण्याची क्षमता यात आहे.
• लोटरिंग म्युनिशन्स तंत्रज्ञान: हे मिसाईल ट्रकमधून लाँच केल्यानंतर काही काळ हवेत घिरट्या घालत राहते आणि स्वतःहून लक्ष्याचा शोध घेऊन त्यावर झडप घालते.
• वेग आणि अचूकता: ताशी ७४० किमी वेगाने धावणाऱ्या या मिसाईलचा सध्या अमेरिका किंवा इस्रायलकडे कोणताही ठोस तोड उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.
ड्रोन युद्धाला बसला लगाम
गेल्या दोन आठवड्यांत इराणच्या जुन्या ‘३५८’ मिसाईलने अमेरिकेचे MQ-9 रीपर आणि इस्रायलचे हर्मीस ९०० यांसारखे अत्याधुनिक ड्रोन्स पाडले आहेत. आता ‘३५९’ च्या एन्ट्रीमुळे ही दहशत अधिकच वाढली असून, इराणच्या या नव्या युद्धनीतीमुळे युद्धाचे चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.







