मुंबई,दि.४: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या २०२३ मधील परदेश दौऱ्याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. विमान कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एकनाथ शिंदे यांचे विमान इराण किंवा इराकच्या हवाई क्षेत्रात पाडले गेले असते, असा धक्कादायक गौप्यस्फोट त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
नेमकी घटना काय? रोहित पवारांचा दावा (Eknath Shinde Plane Incident)
आमदार रोहित पवार यांनी २०२३ सालच्या दावोस (स्वित्झर्लंड) दौऱ्याचा संदर्भ दिला. १६ ते २० जानेवारी २०२३ दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भूषण गगराणी VSR कंपनीच्या VT-CMR विमानातून प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान घडलेला थरार रोहित पवारांनी मांडला:
• इराणची धमकी: मुंबईहून उड्डाण घेतल्यानंतर विमान इंधन भरण्यासाठी बहरीनला थांबले. तिथून पुढे जात असताना विमान इराणच्या हवाई क्षेत्रात शिरले. मात्र, ‘ओव्हरफ्लाईट’ परवानगी नसल्यामुळे इराणी लढाऊ विमाने हे विमान पाडून टाकतील, असा इशारा देण्यात आला.
• इराकचाही इशारा: इराणनंतर या विमानाने मार्ग बदलून इराकच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला. परंतु, तिथेही तात्काळ हवाई क्षेत्र सोडण्याचा आदेश देण्यात आला, अन्यथा विमान पाडण्याची धमकी मिळाली.
• सुरक्षित वापसी: विमानात इंधन कमी असल्याने अखेर ते पुन्हा बहरीनला आणण्यात आले. तिथे ३ तास थांबून आवश्यक परवानग्या मिळवल्यानंतरच विमान झुरिचकडे रवाना झाले.
VSR विमान कंपनीवर गंभीर आरोप (VSR Aviation Controversy)
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी VSR कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत:
1. सुरक्षेतील मोठी चूक: राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रवासासाठी आवश्यक परवानग्या का घेतल्या नव्हत्या?
2. UAE ची बंदी: नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या कंपनीवर संयुक्त अरब अमिरातीने (UAE) सहा महिन्यांसाठी बंदी घातली होती.
3. कोविड काळातील लूट: कोरोना संकट काळात रुग्णांकडून भरमसाठ पैसे उकळल्याचा दावाही रोहित पवारांनी केला आहे.
4. बेकायदेशीर सीट विक्री: खासगी चार्टर विमानातील जागा विकण्याचा अधिकार नसतानाही कंपनीने तसे केल्याचा आरोप त्यांनी केला.
“जो प्रकार अजित पवारांसोबत झाला, तसाच काही गंभीर प्रकार एकनाथ शिंदेंबाबत बाहेर होणार होता का? यावर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सत्य सांगावे,” असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.








