सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना दिलासा

0

सोलापूर,दि.२२: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना (Gram Panchayat) दिलासा मिळाला आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर निवडणूक होईपर्यंत विद्यमान सरपंच यांनाच प्रशासक म्हणून नेमण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शुक्रवारी याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शनिवारी दिल्या आहेत. (Solapur Gram Panchayat)

या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५५ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय कारभार विद्यमान सरपंचांकडेच राहणार असल्याने गावकारभाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत या ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे.

याशिवाय राजीनामा, मयत, अविश्वास ठराव, अपात्रता अथवा प्रवर्गातील उमेदवार न मिळाल्यामुळे रिक्त असलेल्या ३६ ग्रामपंचायतींच्या ४७ जागांसाठी पोटनिवडणुका लागण्याची शक्यता होती. मात्र शासनाच्या निर्णयामुळे निवडणुका होईपर्यंत विद्यमान सरपंचच प्रशासक म्हणून कारभार पाहणार आहेत.

या निर्णयामुळे गावपातळीवरील विकासकामे आणि राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. २०२४ मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतीबाबत मात्र या आदेशात उल्लेख करण्यात आला नसल्याने या ग्रामपंचायतीवरही प्रशासक म्हणून सरपंच काम पाहणार का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

या निर्णयामुळे निवडणुका होईपर्यंत प्रशासनातील सातत्य राखले जाणार असून, गावपातळीवरील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर या आदेशाची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे.

निर्णयापूर्वी कायदेशीर सल्ला घेण्यात आला असून: जयकुमार गोरे 

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून संधी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

“या निर्णयामुळे स्थानिक विकासकामांना गती मिळेल. निर्णयापूर्वी कायदेशीर सल्ला घेण्यात आला असून, न्यायालयालाही याची माहिती देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अधिक प्रभावीपणे राबवता येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती

करमाळा – ५१

माढा – ८३

बार्शी – ९५

उत्तर सोलापूर – २४

मोहोळ – ७२

पंढरपूर – ७२

माळशिरस – ४९

सांगोला – ६२

मंगळवेढा – २३

दक्षिण सोलापूर – ५२

अक्कलकोट – ७२

एकूण – ६५५ ग्रामपंचायती


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here