सोलापूर,दि.११: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत काल (दि.१०) खळबळजनक दावे केले आहेत. विमान अपघातातील मृत्यूवरून महाराष्ट्रात संशयाचे वातावरण असताना रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. रोहित पवार यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या खळबळजनक आरोपांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित गट) कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे लक्ष वेधले आहे. सर्वांच्या नजरा आता ब्लॅक बॉक्स रिपोर्ट आणि अधिकृत तपासाकडे लागल्या आहेत. (Rohit Pawar On Ajit Pawar Aeroplane Crash)
खळबळजनक आरोप | Rohit Pawar On Ajit Pawar Aeroplane Crash
इस्रायलची मोसाद हेर संस्था ज्या पद्धतीने आपल्या शत्रूंना संपवण्यासाठी हातखंडे वापरते तशा पद्धतीने अजितदादांचा घातपात केला गेला असा जाहीर आरोप रोहित पवार यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दादांचा दौरा अचानक का बदलला? विमानाची वेळ का बदलली गेली? पायलट का बदलले? विमान उतरविण्यासाठी बारामती विमानतळावरील 29 क्रमांकाची धावपट्टी सुरक्षित असतानाही 11 क्रमाकांच्या काहीशा धोकादायक धावपट्टीचा आग्रह का धरण्यात आला, या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
सध्या तरी रोहित पवार आज दिल्लीत पोहोचतील आणि दुपारी १२ वाजता प्रेस क्लबमध्ये सविस्तर माहिती देतील. रोहित म्हणतो, “माझ्या मनात प्रश्न आहेत, आणि मी माझे काका गमावले आहेत. महाराष्ट्राने एक नेता गमावला आहे. जोपर्यंत आमच्या शंकांचे निरसन होत नाही तोपर्यंत आम्ही हा मुद्दा उपस्थित करत राहू.”
रोहित पवार यांनी प्रथम विमानाच्या मालक व्हीएसआर बद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यांनी विचारले की विमानाची नियमित देखभाल होते का? टेक लॉग कुठे आहे? विमानाच्या योग्यतेचा अहवाल सार्वजनिक का केला गेला नाही? अपघातापूर्वी ट्रान्सपॉन्डर जाणूनबुजून बंद केला होता का? २०२३ मध्ये झालेल्या दुसऱ्या व्हीएसआर विमान अपघाताचा अंतिम अहवाल अद्याप सार्वजनिक केलेला नाही असा आरोपही त्यांनी केला. डीजीसीए दबावाखाली असू शकते आणि तपास पूर्ण पारदर्शकतेने केला जात नसल्याचा त्यांचा दावा आहे.
रोहित पवार यांनी पायलट कॅप्टन सुमित कपूर यांच्या रेकॉर्डवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की कपूर यांना यापूर्वी मद्यपान केल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते. त्यांनी विचारले की लँडिंग दरम्यान पायलट गप्प का होते. रनवे 29 साठी परवानगी मिळाल्यानंतर रनवे 11 ची विनंती का करण्यात आली, जरी ते अधिक आव्हानात्मक होते? त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले की सह-वैमानिक शांभवी पाठक यांना लिअरजेटवर अधिक अनुभव होता. तर, अंतिम निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आले?
रोहित पवार यांनी या वेळी ‘‘राईज अॅण्ड किल फर्स्ट’’ या पुस्तकातील एक संदर्भ सांगितला. एखाद्या व्यक्तीला मारायचे असेल तर त्या व्यक्तीच्या चालकाला मारले तर विषयच संपला असे त्यात म्हटले होते. या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी तीन नावे घेत शंका उपस्थित केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. व्हीएसआर विमान कंपनी, अॅरो कंपनी आणि कपूर नावाचा पायलट यावर आमची शंका आहे. या सर्व चर्चेत अॅरो नावाच्या कंपनीने व्हीएसआरचे विमान हायर केले होते. सरकारी जीआरनुसार घेतले होते. पवार नावाचा माणूस अॅरोचा हँडलर आहे. त्याने व्हिजिबिलीटी क्लिअर असल्याचे म्हटले आहे. ही कंपनी बऱ्याच राज्यांत काम करत आहे. या कंपनीचा राजकीय नेत्यांशी संबंध आहे, असे रोहित पवार म्हणाले.
तो उशीर जाणीवपूर्वक केला गेला का?
दादा बारामतीसाठी कारने निघणार होते. त्यांचा ताफाही तयार होता. पण एक नेता दादांना भेटायला येणार होता त्याला पोहोचायला उशीर झाला. पूर्व विदर्भातील एका नेत्याला फाईल क्लिअर करायची होती. त्यामुळे दादा थांबले होते. ती फाईल मंत्रालयात असल्याने ट्रफिकमुळे फाईल पोहोचायला उशीर झाला. त्यातही वेळ गेला. त्यामुळे दादा गाडीने जाऊ शकले नाहीत आणि त्यांनी 7.13 वाजता विमान बुक केले. तो उशीर जाणीवपूर्वक केला गेला का? असाही सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. पूर्व विदर्भातील हा नेता प्रफुल्ल पटेल हे असावेत, अशी चर्चा आहे.








