सोलापूर,दि.30: 1 कोटी 10 लाख रुपयांचे फसवणूक प्रकरणात न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. ‘नीट’ परीक्षेत 600 पेक्षा जास्त गुण मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन एका पालकाची 1 कोटी 10 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अरविंद गोविंद चंडक (रा. सत्यम रेसिडेन्सी, भवानी पेठ) याचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. केंद्रे यांनी फेटाळून लावला आहे.
आरोपीने फिर्यादी मेहदीअली इकराम सय्यद (रा. टिळकनगर, मजरेवाडी) यांच्या मुलाला ‘नीट’ परीक्षेत उत्तम गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी त्याने वेळोवेळी फिर्यादीकडून एकूण 1 कोटी 10 लाख रुपये उकळले. मात्र, दोनदा परीक्षा देऊनही मुलाला आश्वासन दिल्याप्रमाणे गुण मिळाले नाहीत. फिर्यादीने आपली रक्कम परत मागितली असता आरोपीने केवळ 10 लाख रुपये परत केले आणि उर्वरित 1 कोटी रुपये देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या गुन्ह्यात अटकेच्या भीतीने आरोपीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास विरोध करताना सरकारी वकिल डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी युक्तिवाद केला की, गुन्ह्याचे स्वरूप अतिशय गंभीर असून 1 कोटी रुपयांची मोठी रक्कम अद्याप हस्तगत करायची आहे. आरोपी सध्या फरार असून, त्याला जामीन मिळाल्यास तो पुराव्यांशी छेडछाड करण्याची किंवा कायमचा फरार होण्याची दाट शक्यता आहे. गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक आहे.
न्यायालयाने सरकारी पक्षाचा हा युक्तिवाद मान्य करत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. यात सरकारतर्फे डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी तर आरोपीतर्फे अॅड. आर. के. सिंग यांनी बाजू मांडली.








