सोलापूर,दि.२१: सोलापूरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणूक 15 जानेवारीला होणार आहे. निवडणुकीसाठी अनेकजण पक्षांतर करताना दिसून येत आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात विरोधी पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. गोरे यांनी सुरुवातीपासूनच अनेकांना भाजपात प्रवेश देण्याचा सपाटा लावला आहे.
सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला धक्का देत माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद भोसले,ओंकार राजगे, रेश्मा कांबळे आणि रविकांत कांबळे (शिवसेना ठाकरे गट), यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेस नेत्या व खासदार प्रणिती शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे भोसले यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
तर माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत. ओंकार राजगे हे माजी नगरसेवक दीपक राजगे यांचे चिरंजीव असून, ते शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे रंजीता चाकोते, सुधा अळ्ळीमोरे, गुरुशांत धुतरगावकर आदी होते.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून संघटनात्मक बांधणीवर भर दिला जात असून, विविध पक्षांतील प्रभावी नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश ही आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. पालकमंत्री गोरे यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे भाजपच्या हालचालींना अधिक वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.








