सोलापूरसह राज्यात थंडी वाढली, पुढील काही दिवस थंडी कायम राहणार 

0

सोलापूर,दि.२१: सोलापूरसह राज्यात थंडी (Cold Wave) वाढली असून पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शनिवारी सोलापूरचे किमान तापमान 12.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. पुढील काही दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. राज्याच्या अनेक भागात थंडीची लाट पसरली असून, किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. खासकरून उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा प्रभाव अधिक असून, जळगाव मध्ये शनिवारी सर्वात कमी 6 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले.

जम्मू काश्मीर सह काही राज्यात सद्या हिमवर्षाव सुरू आहे. त्यामुळे वायव्य,पूर्व भारतात किमान तापमान घटले आहे. मध्य प्रदेश मध्ये देखील किमान तापमानाचा पारा खालावला आहे. त्यामुळे राज्यातील थंड वाऱ्यात वाढ झाली असून, उत्तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा,विदर्भ गारठला आहे. शनिवारी अनेक भागात थंड दिवस अनुभवयास मिळाला. नाशिक,जळगाव, अहिल्यानगर, यवतमाळ, संभाजी नगर परिसरात थंडीची लाट नोंदविण्यात आली. येथे किमान तापमान 6 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान होते. गेले कित्येक दिवस या सर्व भागात थंडीची लाट असून, पुढे देखील ती कायम राहणार आहे.

थंडी कायम राहणार 

पुढील आठवडाभर राज्यात थंडी कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. याशिवाय रविवारी नाशिक, जळगाव या जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 

शनिवारी राज्याच्या विविध शनिवारी नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे

सोलापूर 12.3, नाशिक 6.9, डहाणू 15, कोल्हापूर 14.1, कुलाबा 20.1, पुणे 8.1, रत्नागिरी 17, महाबळेश्वर 12.6, हर्णे 21.2, माथेरान 17.2, सातारा 9.4, सांताक्रुझ 14.6, उदगीर 11.5, नंदुरबार 12.8, नांदेड 10.1, सांगली 11.9, छत्रपती संभाजी नगर 10.8, धाराशिव 11,  बारामती 7.6, परभणी 10.8, जेऊर 7.5, अहिल्यानगर 6.4, नागपूर 8.6, गोंदिया 8.2 अंश सेल्सिअस


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here