सोलापूर,दि.१७: सोलापूर राष्ट्रवादी (अजित पवार गट) भवनात इच्छुकांची गर्दी पाहायला मिळाली. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगळवारपासून उमेदवारी अर्ज वितरणास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी उसळली असून, माजी महापौर, माजी उपमहापौर तसेच पाच माजी नगरसेवकांसह तब्बल १२२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले.
काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी महापौर मकबूल मोहोळकर यांनी प्रभाग क्रमांक १४ साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे यांनी प्रभाग क्रमांक १२ साठी, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रभाग २२, माजी ज्येष्ठ नगरसेवक तौफिक शेख यांनी प्रभाग २०, सिद्धेश्वर आनंदकर यांनी प्रभाग १, माजी नगरसेविका नूतन गायकवाड यांनी प्रभाग १७, तस्लीम शेख यांनी प्रभाग क्रमांक २०, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संगीता जोगदनकर यांनी प्रभाग क्रमांक २६ तसेच माजी नगरसेवक तौफिक शेख यांचे चिरंजीव अदनान शेख यांनी प्रभाग क्रमांक १६ साठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. कलीम तुळजापूर यांनीही उमेदवारी अर्ज घेतला. काही इच्छुकांनी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्याकडे अर्ज सुपूर्द केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी “आपकी बार ७५ पार” हा नारा दिला असून, संपूर्ण १०२ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत राष्ट्रवादी भवनात उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती यामध्ये पुरुषांबरोबर महिलांचा आणि युवा वर्गाचा लक्षणीय सहभाग होता. महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे तसेच सहसंपर्क प्रमुख व विधानसभा उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे यांचे संपूर्ण मार्गदर्शन लाभणार आहे. “सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, स्वच्छ प्रतिमेचे आणि जनतेशी जोडलेले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मैदानात उतरवत आहे. ‘आपकी बार ७५ पार’ हे लक्ष्य निश्चितच साध्य होईल,” असे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले.








