सोलापूर महापालिका मतदार यादीतही मोठी गडबड झाल्याची चर्चा 

0

सोलापूर,दि.२१: मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. काँग्रेसने मतदार यादीत घोळ असल्याचे सांगत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मतदार यादीत घोळ असल्याची देशभर चर्चा सुरु असतानाच आता सोलापूर महापालिकेने जाहीर केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीतही मोठी गडबड असल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. 

महापालिका प्रशासनाने गुरुवारी प्रारूप मतदार यादी जाहीर केली. यादीवर पहिल्या दिवशी एकही हरकत किंवा सूचना दाखल झाली नसल्याचे सांगण्यात आले.

प्रभाग क्र. १२ मधील मतदारांची नावे मोठ्या प्रमाणावर प्रभाग क्रमांक ९ मध्ये घुसडण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. यामुळे प्रभाग १२ मधील निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांमध्ये  मोठी अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. या संदर्भात हरकत दाखल करणार असल्याचे अभिषेक चिंता यांनी सांगितले. नेमकी अशी चूक कशी झाली असा सवाल करुन याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

अनेक प्रभागांच्या मतदार यादीत घोळ आहे. अनेक मतदारांची नावे गडप करण्यात आली असून काही प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात समाविष्ट करण्यात आल्याचे तक्रारीवरून दिसून येते.

महापालिकेच्या कौन्सिल हॉलमध्ये मतदारयादी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली असूनnनागरिक आणि कार्यकर्ते गुरुवारी आपली नावे तपासताना दिसून आले. विविध प्रभागांमधील मतदारयादी संदर्भात झालेल्या चुका आणि विसंगती पाहता दुरुस्तीची प्रक्रिया कितपत पारदर्शक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, प्रभाग क्र. १८ मधील एका सोसायटीची संपूर्ण मतदार नावे यादीतून गायब झाल्याचे कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. या सोसायटीमध्ये ३०० ते ३५० मतदार असून ही नावे पूर्णपणे वगळण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. मतदार यादी पाहताना अनेक जणांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here