सोलापूर,दि.७: सोलापूर विमानतळ परिसरातील नागरिकांना पोलिसांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. सोलापूर-गोवा तसेच सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे. यामुळे विमानतळ परिसरात विमान सुरक्षेच्या दृष्टीने काही नियमांचे पालन करणे आवश्यक असून एमआयडीसी विमानतळ परिसरात राहणाऱ्या सर्व रहिवाशांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन एमआयडीसी पोलिसांनी केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
विमानतळ परिसरात पतंगबाजीस बंदी घालण्यात आली असून, कोणीही पतंग उडवू अथवा अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करू नये, असे सांगण्यात आले आहे. तसेच, लेझर लाईट, शार्पी लाईट, हॅलोजन लाईट यांसारखी हवेतील तेजस्वी प्रकाश फेकणारी साधने कोणत्याही कार्यक्रमात वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
विमानतळ सुरक्षा भिंतीतून प्रवेश करणे, कोणत्याही प्रकारे आत जाण्याचा प्रयत्न करणे हा कायद्यानुसार गुन्हा ठरणार असून, असे केल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. तसेच विमानतळाच्या भिंतीलगत असलेल्या मटण विक्रेत्यांनी दुकानातील वेस्टेज किंवा अवशेष टाकू नयेतअन्यथा त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
परिसरातील रहिवाशांनी घरांच्या छतावर किंवा उंच ठिकाणी झेंडे, पताका लावू नयेत ,अशा वस्तूंमुळे विमानसेवेत अडथळे निर्माण होऊ शकतात, असे पोलिसांनी म्हटले आहे. सर्व नागरिकांनी विमानतळाच्या सुरक्षेसाठी आणि विमानसेवा सुरळीत राहावी म्हणून या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी केले आहे.








