अजित पवार यांच्यावर अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप 

0

मुंबई,दि.६: Ambadas Danve On Ajit Pawar: फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या हा अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे, असा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केला आहे. दानवे यांनी X वर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, १८०० कोटींची जमीन ३०० कोटींत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे ५०० रुपये! पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातील तब्बल ४० एकर जमीन सरकारी नियम वाकवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. 

अंबादास दानवे यांची पोस्ट | Ambadas Danve On Ajit Pawar

उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं. 

गंमत तर पुढे आहे..एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल! 

दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा.. कमाल झाली! २२ एप्रिल २०२५ रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४८ तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे २७ दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये ५००!

फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र!


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here