बीड,दि.18: Chhagan Bhujbal On OBC Mahaelgar Sabha: ओबीसी महाएल्गार सभेत बोलताना ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पहिल्यांदाच भाजपाला थेट इशारा दिला आहे. भाजपच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय, ओबीसीच्या ताकदीवर तुम्हाला 145 आमदार मिळाले आहेत. त्यामुळे यावर मार्ग काढा असे वक्तव्य भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. ओबीसींच्या मुळावर उठलेल्या कोणाही समाजाच्या नेत्याला आडवे करा. ओबीसी विरोधकांना डोक्यात ठेवा, येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा हिशोब करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर ओबीसी महाएल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. आ. धनंजय मुंडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. मनोज कायंदे, प्रा. मनोहर धोंडे, प्रा. लक्ष्मण हाके, लक्ष्मण गायकवाड, पंकज भुजबळ, शब्बीर अन्सारी आदी उपस्थित होते. भाजपा नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भुजबळ यांनी जोरदार टीका केली.

काय म्हणाले छगन भुजबळ? | Chhagan Bhujbal On OBC Mahaelgar Sabha
विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला. विखे पाटील हे गरज नसताना मनोज जरांगेंकडे जातात. भाजपच्या लोकांना मला सांगायचे आहे की तुमच्या लोकांना आवरा. मराठा समाज आणि आमच्या अंतर पडले ते अंतर अंतरवलीच्या दरीद्री पाटलामुळे पडले आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.
हिशोब करा
हिशोब करा राज्यात 54 टक्के ओबीसी,13 टक्के दलीत, 7 टक्के आदिवासी, 3 टक्के ब्राह्मण त्यानंतर मुस्लिम आणि जे शिल्लक राहतात तो मराठा समाज, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. तसेच आता दुहेरी लढाई लढणार, एक न्यायालयात आणि दुसरी रस्त्यावरची लढाई. आम्ही पक्षाच्या दावणीला बांधलो नाही. इथे फक्त ओबीसीसाठी लढा देत आहोत. पक्षाचे काम आल्यावर आम्ही त्यासाठी लढू. जे जे ओबीसीच्या मुळावर उठले असतील त्यांना आडवे करा, असा इशारा भुजबळ यांनी दिला.
आम्ही कोर्टात, रस्त्यावर लढू. ओबीसी समाजाने मनात आणले तर नेत्यांना सतरंजी उचलायला लावतील, असा इशाराही त्यांनी दिला. सकाळी अर्ज केला, त्याच दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळते. अधिकारी इतके फास्ट कसे झाले, अशी टिपणी करत भुजबळ म्हणाले, जिथे 8-10 महिने लागतात, तिथे दहा तासात प्रमाणपत्र कसे? असा प्रश्न भुजबळ यांनी केला.
विजय वडेट्टीवार यांच्यावर देखील भुजबळ यांनी टीका केली. नगरला आले नाहीत, पंढरपूरला आले नाहीत, बीडला आले नाहीत, कुठला दबाव तुमच्यावर आहे. तुम्ही सांगितले होते तुमच्याबरोबर आहे. मग तुम्ही का नाही आलात ? असा सवाल भुजबळांनी केला.








