मुंबई,दि.१२: Ramesh Chennithala On Raj Thackeray: मनसेला महाविकास आघाडीत सामील करून घेणार का? याबाबत काँग्रेस नेत्याने मोठे विधान केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकत्र येऊन महापालिका निवडणुका लढणार असल्याचे जाहीर केले आहे. मनसे-शिवसेनेची (ठाकरे गट) युती होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्ष महाविकास आघाडीत आहे.
शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस पक्ष हे महाविकास आघाडीचे प्रमुख पक्ष आहेत. महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता आली नाही. मनसे आणि ठाकरे गटाची युती झाल्यास मनसे पक्षही महाविकास आघाडीत सामील होणार का? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्यास मनसेचा महाविकास आघाडीत समावेश होणार का? याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी मोठं विधान केलं आहे.
काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीवर बोलताना म्हणाले की, त्या दोघांच्या युतीचा अद्याप निर्णय झालेला नाही ते दोघेभाऊ एकत्र येत असतील तर त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. राज ठाकरे अद्याप महाविकास आघाडीत नाहीत. त्या दोन भावांचा निर्णय झाला की चर्चा करून काँग्रेस निर्णय घेईल, असे चेन्नीथला म्हणाले.
‘दोन भाऊ एकत्र येत असतील आम्हाला काही अडचण नाही, मात्र मनसेला आघाडीत घ्यायचं की नाही तो निर्णय आम्ही चर्चेनंतर घेऊ’. तसेच विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, ‘दोन भाऊ एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत त्यांना एकत्र यायचं असेल तर येऊ द्या’