दीपक काटेवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी 

0

सोलापूर,दि.१६: संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर शाईफेक करून खुनी हल्ला करणारा गुन्हेगार असलेला दिपक काटे व त्याच्या साथीदार यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याबाबतचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापूर विमानतळावर भेटून देण्यात आले. 

यावेळी अजित पवारांनी दोन्ही सभागृहामध्ये सदस्यांनी आवाज उठवलेला आहे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. 

दि. 13 जुलै रोजी अक्कलकोट जि. सोलापुर येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड हे नियोजित कार्यक्रमाकरीता आले असताना, गुन्हेगार प्रवृत्ती असलेल्या दिपक काटे व त्यांच्या साथीदार यांनी प्रविण गायकवाड यांच्या अंगावर चालून जाऊन त्यांच्यावर शाईफेक करून जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.

दिपक काटे यांच्यासह काही साथीदार हे परप्रांतीय होते व त्याच्यावर सुद्धा यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. काटे यांच्यावर अवैध शस्त्र बाळगणे, खुन करणे, खंडणी मागणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल असुन यापूर्वी त्यांना करावास सुद्धा झालेला आहे. यावरून हा आरोपी अट्टल गुन्हेगार आहे सिद्ध होते. 

या प्रकरणी या आरोपी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हगारी नियंत्रण कायद्या अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी तसेच या जीव घेण्या हल्ल्यामध्ये अक्कलकोट मधील स्थानिक 30 ते 40 जमाव प्रत्यक्षदर्शी व्हिडिओ दिसून येत आहे. त्या स्थानिक शिवधर्माच्या पदाधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात यावी अन्यथा संभाजी ब्रिगेड संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरविंद शेळके,  जिल्हाध्यक्ष वकील आघाडी अॅड. गणेश कदम, जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर, शहर कार्याध्यक्ष सतीश वावरे, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, श्रेयस माने, राज स्वामी, गजानन शिंदे, मल्लू भंडारे आदीसह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here