नागेश ऑर्केस्ट्रा बार छापा प्रकरण सपोनि शितलकुमार कोल्हाळ निलंबित

0

सोलापूर : सोलापूर विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील नागेश आर्केस्ट्रा बारवर (Nagesh Orchestra Bar) दि. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टीपरे (Assistant Commissioner of Police Dr. Preeti Tipare) विभाग-२ यांच्या मार्फत छापा टाकण्यात आला होता. त्यावेळेस विजापूर नाका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ (Assistant Inspector of Police Shitalkumar Kolhal) व इतर कर्मचारी यांना मदतीसाठी बोलविण्यात आले होते.

घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ आल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टीपरे विभाग-२ यांनी त्यांना सदर घटनास्थळाचा जप्ती पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सपोनि शितलकुमार कोल्हाळ यांनी सदर घटनास्थळी जप्ती पंचनामा केला. परंतू त्यामध्ये जेणेकरून निष्पन्न होणाऱ्या जवळपास २० ते २५ आरोपी यांना फायदा व्हावा या उद्देशाने जाणीवपूर्वक उणीवा ठेवल्याचे निष्पन्न झाले.

त्यासंदर्भात सपोनि शितलकुमार कोल्हाळ यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व पुनःश्च विचारणा केली असता काही एक उत्तर न देता व कोणासही काहीही न सांगता ते रुग्णता रजेवर गेले आहेत. तसेच त्यांच्याकडे यापूर्वीचे एकूण १८ गुन्हे प्रलंबित आहेत. त्यापैकी भादंवि ४२० (फसवणुक) चे ०६ गुन्हे, भादंवि ३९२ (जबरी चोरी च ०४ गुन्हे भादंवि ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३५४ (विनयभंग) व ३६३ (अपहरण) चे असे प्रत्येको ०१ गुन्हा प्रलंबित आहे व असे महत्वाचे प्रलंबित गुन्हे कोणाकडेही तपासासाठी हस्तांतरीत न करता स्वतःच्या गैरकायदेशीर ताब्यात ठेवले.

जेव्हा की, गंभीर गुन्ह्याचा तपास मुदतीत निर्गती होणे आवश्यक असते. या गंभीर कसुरीमुळे सपोनि शितलकुमार कोल्हाळ यांना दि. २४ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या आदेशानुसार शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here