मुंबई,दि.८: राष्ट्रीय स्वयंसेवक संघशी (RSS) संलग्न मुस्लिम राष्ट्रीय मंचने वक्फ सुधारणा कायद्याबाबत देशभर पसरलेले गैरसमज आणि अफवा दूर करण्यासाठी १०० हून अधिक पत्रकार परिषदा आणि ५०० चर्चासत्रे आयोजित करण्याची घोषणा केली आहे. राजघाट येथील ईद मिलन कार्यक्रमादरम्यान मुस्लिम राष्ट्रीय मंचने ही घोषणा केली.
सोमवारी मुस्लीम राष्ट्रीय मंचातर्फे सत्याग्रह मंडप, गांधी स्मृती, राजघाट येथे ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित असलेले नेते, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि धार्मिक व्यक्तिमत्त्वांनी वक्फ सुधारणा कायद्याचे वर्णन मुस्लिम समुदायासाठी एक ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी पाऊल असल्याचे सांगितले.
या प्रसंगी, वक्फ दुरुस्तीवरील संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल, मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संरक्षक इंद्रेश कुमार आणि आरएसएस संपर्क प्रमुख रामलाल यांनी या कायद्याची गरज आणि त्याचे व्यापक सामाजिक परिणाम यावर भाष्य केले.
अफवा दूर करण्यासाठी चर्चासत्रे
मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संरक्षक इंद्रेश कुमार यांनी आपल्या भाषणात वक्फ सुधारणा कायद्याबाबत पसरलेले गैरसमज आणि अफवा दूर करण्याची वचनबद्धता व्यक्त केली. या कायद्याचे उद्दिष्टे आणि फायदे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी मंच देशभरात १०० हून अधिक पत्रकार परिषदा आणि ५०० हून अधिक चर्चासत्रे आयोजित करेल अशी घोषणा त्यांनी केली. कुमार म्हणाले, ‘हा कायदा मुस्लिम समुदायाच्या स्वाभिमान, न्याय आणि समानतेच्या अधिकाराला आणखी बळकटी देईल.’
कायदा कोणाच्याही विरोधात नाही
वक्फ मालमत्तांच्या गैरवापर आणि गैरव्यवस्थापनाच्या दीर्घकालीन समस्यांवर प्रकाश टाकत त्यांनी सांगितले की, या दुरुस्तीमुळे त्यांचा पारदर्शक आणि न्याय्य वापर सुनिश्चित होईल, ज्यामुळे समाजातील सर्व घटकांना फायदा होईल. कुमार यांनी भर दिला की हा कायदा कोणाच्याही विरोधात नाही तर सर्वांच्या हिताचा आहे. जे भारतीय समाजात परस्पर विश्वास आणि सहकार्याला प्रोत्साहन देते.