लातूर,दि.7: 103 शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटीस पाठवली आहे. हे प्रकरण लातूर जिल्ह्यातील तळेगाव येथील आहे. तळेगाव येथील 103 शेतकऱ्यांच्या 300 जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. या जमिनी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. NDTVने याबाबत वृत्त दिले आहे.
वक्फ बोर्डाने केलेल्या दाव्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वडिलोपार्जित जमिनी पिढ्यान पिढ्या आपल्याच वहिवाटीखाली आहेत, असे तळेगावातील शेतकरी सांगत आहेत. वक्फ बोर्डाने केलेल्या दाव्यानुसार या जमिनी शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने दिलेल्या आहेत. आता परत वक्फ बोर्डाने परत मागितल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण औरंगाबादच्या न्यायालयाने वक्फ याचिकेन्वये हा दावा केला आहे. त्याचप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांना याद्वारे नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. वक्फ न्यायाधिकरणात वैयक्तिकरित्या किंवा प्लीडरद्वारे अपीलाशी संबंधित सर्व भौतिक प्रश्नांची उत्तरे देण्याबाबत समन्स बजावण्यात आलं आहे.
अपील, दावे, निश्चित केलेले मुद्दे निकाली काढण्यासाठी अपीलाच्या अंतिम निकालासाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्या दिवशी तुम्ही सर्व साक्षीदार आणि कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. वडिलोपार्जित जमिनी पिढ्यान पिढ्या आपल्याच वहिवाटीखाली आहेत. त्या वक्फ बोर्डाच्या नक्कीच नाहीत असं म्हणत शेतकऱ्यांनी एक लेखी निवेदन सादर केलं आहे. आपल्याला या प्रकरणी शासनाने न्याय मिळवून द्यावा, अशी विनंतीही या शेतकऱ्यांनी केली आहे.