सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार 

0

सोलापूर,दि.3: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (UBT) अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून श्री सिध्देश्वर सहकारी कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच येथून इच्छुक असणारे माजी आमदार दिलीप माने यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बाबा मिस्त्री यांनी प्रहार संघटनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

आता अर्ज माघार घेण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. मात्र, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज सण असल्याने तीन दिवस शासकीय सुटी आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत केवळ पाचच तासात अर्ज माघारी घेता येणार आहे. पहिल्यांदाच सर्वच मतदारसंघांत उमेदवारांची संख्या वाढली असल्याने आता कोण कोण माघार घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

काडादी आणि माने यांच्या भूमिका ठरणार महत्त्वाची

धर्मराज काडादी यांनी विधानसभा निवडणूक लढवावी म्हणून राष्ट्रवादी (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार तसेच काँग्रेस नेत्या खासदार प्रणिती शिंदे आग्रही होत्या. पवार आणि शिंदे यांनी आग्रह केल्यानंतर काडादी यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. श्री सिध्देश्वर परिवारही काडादी यांनी विधानसभा निवडणूक लढवावी म्हणून आग्रही होता. मात्र काडादी यांना उमेदवारी देण्यात आली नाही. काडादी यांना उमेदवारी दिली नसल्याने श्री सिध्देश्वर परिवार आक्रमक झाला आहे. काडादी यांना उमेदवारी मागे घेतली तर अमर पाटील यांना मोठा दिलासा मिळेल. 

माजी आमदार दिलीप माने यांचे नाव जाहीर करूनही काँग्रेसने त्यांना एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे दिलीप माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिलीप माने यांचे कार्यकर्ते एबी फॉर्म न दिल्याने नाराज व आक्रमक झाले आहेत. याचा फटका काँग्रेस पक्षाला बसू शकतो. माने यांनी उमेदवारी मागे घेतली तर अमर पाटील यांना मोठा दिलासा मिळेल. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपने आमदार सुभाष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. तर श्रीशैल हत्तुरे यांनी बंडखोरी केली आहे.

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपाने आमदार विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शोभा बनशेट्टी यांनी उमेदवारी कायम ठेवली तर आमदार देशमुख यांना मोठा फटका बसू शकतो. मात्र बनशेट्टी यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यास देशमुख यांना मोठा दिलासा मिळू शकतो. 

चिन्ह वाटप केले जाणार

अर्ज माघार घेण्यासाठी सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ आहे. त्यानंतर एकूण सर्वच मतदारसंघातील अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. जे उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील, त्यांना प्रमुख राजकीय पक्ष वगळून इतर अपक्षांसह सर्वच उमेदवारांना लागलीच चिन्ह वाटप केले जाणार आहे.

सोलापूर दक्षिण: अमर पाटील (मविआ- उध्दवसेना) – बंडखोरी – धर्मराज काडादी (काँग्रेस), दिलीप माने, बाबा मिस्त्री, सुभाष देशमुख (महायुती-भाजप) – बंडखोरी – श्रीशैल हत्तुरे (भाजप), मेनका राठोड (भाजप)

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार महेश कोठे यांच्यात लढत होणार आहे. 

विजयकुमार देशमुख (महायुती-भाजप) – बंडखोरी : शोभा बनशेट्टी, संजय साळुंखे, अमर बिराजदार (भाजप) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

अर्ज माघारी घेण्याची शक्यता

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून धर्मराज काडादी, माजी आमदार दिलीप माने हे अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शक्यता आहे. काडादी आणि माने हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यामुळे अर्ज मागे घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे अमर पाटील यांना मोठा दिलासा मिळेल. तर दुसरीकडे श्रीशैल हत्तुरे आणि मेनका राठोड हेही उमेदवारी अर्ज मागे घेतील. यामुळे सुभाष देशमुख यांना मोठा दिलासा मिळू शकतो. तर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शोभा बनशेट्टी आणि संजय साळुंखे हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे याचा फायदा देशमुख यांना होणार की कोठे यांना होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here