मुंबई,दि.1: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाला आवाहन केले आहे. ओबीसींना माझी विनंती आहे की आता जर तुम्ही घरात बसलात तर 2024 नंतर ओबीसींचे आरक्षण संपलेले असेल. आम्ही ओबीसींना योग्य ती दिशा दिली आहे आणि ते मतपेटीतून दाखवून देतील, असे लक्ष्मण हाके म्हणाले. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलेले आहे.
अशातच शिवसेना (शिंदे गट) नेत्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अनेक राजकीय नेत्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरांगे यांनी या निवडणुकीत मुस्लिम, मराठा व दलितांचे ऐक्य करत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला होता.
दोन दिवसांत कोणता उमेदवार निवडणूक लढविणार आणि कोणाला पाडायचे याची माहिती जरांगे जाहीर करणार आहेत. याला प्रत्यूत्तर देण्यासाठी ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी तयारी केल्याचे जाहीर केले आहे.
4 तारीखला जरांगे उमेदवार देणार नाहीत, तर हॉस्पिटलला अॅडमिट असतील असे सांगताना मराठ्यांच्या यादीला ओबीसींची यादी आम्ही तयार केल्याचे हाके म्हणाले. आनंदराज आंबेडकर यांनी त्यांच्या मुलाला आमच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीला पाठवले होते. ओबीसी आरक्षणाबाबत जरांगेंची भूमिका त्यांना मान्य आहे का? असा सवाल हाके यांनी आंबेडकर यांना केला आहे.