सोलापूर,दि.23: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने रविवारी (दि.20) पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. यात सोलापूर शहर उत्तरमधून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख तर दक्षिण सोलापूरमधून आमदार सुभाष देशमुख यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आता विधानसभेच्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघावरुन महायुतीमधील भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात घमासान सुरु असून या मतदारसंघावर दोन्ही पक्षाकडून दावा करण्यात आला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीमधील जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. सोलापूर शहर मध्य मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटला हे अद्याप स्पष्ट नसताना राजकीय पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते दावे प्रतिदावे करीत आहेत. ही जागा आपल्यालाच सुटली असे सांगत उमेदवारांची नावे देखील जाहीर केली जात आहेत. गेल्या दोन दिवसापासून समाज माध्यमातून हा प्रचार केला जात आहे.
दरम्यान आज भाजपाने ही जागा आपल्याच पक्षाला सुटली असल्याचा दावा केला आहे. माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांची उमेदवारीदेखील जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोठे यांचा फोटोदेखील सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला आहे. हा दावा भाजपतील एका गटाने खोडून काढला आहे. जागा भाजपला सुटली हे खरे आहे परंतु उमेदवार देवेंद्र कोठे नाहीत असे या गटाचे म्हणणे आहे.
आम्ही फडणवीस यांना लेखी पत्र पाठवुन कोठे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. याठिकाणी पक्षाचे उपाध्यक्ष अनंत जाधव किंवा सरचिटणीस पांडुरंग दिड्डी यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे. आमच्या मागणीचा फडणवीस विचार करुन निर्णय घेतील असा विश्वास या गटातील माजी नगरसेवकांनी व्यक्त केला.
महायुतीमधील भाजपचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र शहर मध्यची जागा भाजपाला सुटली नसुन ती शिवसेनेच्या हक्काची असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपाकडून याबाबत अपप्रचार केला जात असल्याचे सांगत शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी भाजपाचा निषेध केला आहे. शहर मध्य या जागेवर पुर्वीपासून शिवसेना लढत आहे. यावेळीही शिवसेनाच लढणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबतीत चर्चा झाली असुन त्यांनी ही जागा भाजपाला सोडणार नसल्याचे सांगितले आहे असेही काळजे म्हणाले.
सोलापूर महापालिकेत भाजपाला सत्ता मिळवून देण्यात या मतदारसंघाचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. गेल्या निवडणुकीत सतरा नगरसेवकांनी याच भागात कमळ फुलवले होते. मुस्लिमबहुल मतदारसंघ असुनही भाजपाला मिळणारे मतदान लक्षणीय आहे. अनेक वर्षानंतर याठिकाणी पुन्हा लढण्याची संधी मिळाली तर ही जागा आम्ही जिंकु असा दावा भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केला आहे.
हे आहेत इच्छुक
शिंदेसेनेने यापूर्वी एकदा ही जागा जिंकली आहे. शिवशरण पाटील हे त्यावेळी निवडून आले होते. गेल्यावेळीही दिलीप माने आणि महेश कोठे यांनी चांगली मते मिळवली होती. बहुरंगी लढतीचा फायदा मिळेल असे शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटते. ही जागा सोडवून घेण्यासाठी या पक्षातील अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आपले बंधू शिवाजी यांच्यासाठी आग्रह धरला आहे. मात्र ते बाहेरचे उमेदवार असल्याने त्यांना विरोध आहे. जिल्हाप्रमुख अमोल शिंदे हेखील इच्छुक आहेत. प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनीही तिकीटाची मागणी केली आहे. यापैकी कोणाची लाँटरी लागणार हे जागावाटप झाल्यानंतरच कळेल.