मुंबई,दि.14: काँग्रेस (Congress) जाहीरनाम्यात मोठी आश्वासने देण्याची शक्यता आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडी व महायुती यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) व कॉंग्रेस तर महायुतीत भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) या प्रमुख पक्षांचा समावेश आहे. महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. तसेच शेतकऱ्यांसाठीही योजना जाहीर केल्या आहेत.
आता काँग्रेसकडूनही निवडणूक जाहीरनाम्यातून जोरदार प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा बनवण्याचं काम सुरू असून या जाहीरनाम्यात सर्वसामान्य जनतेला भुरळ घालणाऱ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.
लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला उत्तर देण्यासाठी महिलांसाठी महालक्ष्मी योजनेची घोषणा केली जाऊ शकते. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 2 हजार रुपये देण्याचं आश्वासन देण्यात येईल. तसंच तरुणांना आपल्याकडे खेचण्यासाठी बेरोजगार भत्ता देण्याची घोषणाही काँग्रेसकडून होऊ शकते. या योजनेतून बेरोजगार तरुणांना प्रतिमहिना 4 हजार रुपये देण्याचं आश्वासन काँग्रेसकडून दिलं जाऊ शकतं.
मागील काही महिन्यांपासून राज्यात शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी काँग्रेसकडून कृषी समृद्धी योजना आणली जाऊ शकते. या योजनेतून शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्याचं आश्वासन काँग्रेसकडून देण्यात येणार असल्याची माहिती आहे.